Municipal Election Reservation
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सध्या प्रभागांच्या आरक्षणासह मतदार याद्या प्रसिद्धीची प्रक्रिया सुरू आहे. आयोगाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार सोमवारी (दि. १७) महापालिकेने प्रभागांचे प्रारूप आरक्षण प्रसिद्ध केले. त्यावर येत्या २४ नोव्हेंबरपर्यंत हरकती, सूचनांसाठी मुदत दिली असून, २ डिसेंबरपर्यंत अंतिम आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध केले जाणार आहे.
कोरोना महामारीमुळे पाच वर्षे पुढे लांबलेल्या महापालिका निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने लवकरच होणार आहेत. त्यासाठी निवडणूक आयोग आणि राज्य शासनाच्या सूचनेनुसार सध्या महापालिकांकडून प्रक्रिया राबविण्यात येत आहेत. पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीने महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी आयोगाच्या आदेशाने महापालिकेने प्रभाग रचना पूर्ण केली. त्यानंतर प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू केले असून, तेही आता अंतिम टप्प्यात आहे.
तर आरक्षण सोडतीसाठी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार महापालिकेने नुकतीच आरक्षणाची सोडत काढली. त्यातील प्रारूप आरक्षणाचा आराखडा सोमवारी प्रसिद्ध करण्यात आला. या आराखड्यावर येत्या २४ नोव्हेंबरपर्यंत नागरिकांना सूचना व हरकती दाखल करता येणार असून, प्राप्त हरकती व सूचनांवर विचार करून महापालिका आयुक्तांनी २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबरपर्यंत आदेशाच्या परिशिष्ट ११ मधील नमुन्यात निर्णय घेणे अपेक्षित आहे. तर २ डिसेंबरपर्यंत आयोगाच्या मान्यतेनंतर अंतिम आरक्षण विहित नमुन्यात शासन राजपत्रात प्रसिद्ध केला जाणार आहे.