Municipal Corporation stopped the encroachment campaign on Jalna Road
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण शहर अतिक्रमणमुक्त करणारच आणि नवीन विकास आराखड्यानुसार रस्ते रुंद करणार, अशा डिंग्या मिरवत मनपाच्या सिंघम होऊ पाहणाऱ्या अधिकाऱ्यांनी अभूतपूर्व अशी अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली.
सर्वसामान्य, गोरगरिबांच्या हजोरो मालमत्तांवर बुलडोझर फिरवला. मात्र जेव्हा जालना रोडवर कारवाईची वेळ आली, तेव्हा या बड्या व्यापारी, उद्योजकांसमोर मनपाच्या सिंघम अधिकार्यांनी अक्षरशा नांग्या टाकल्या. बाबा पट्रोल पंप ते सिडको बसस्थानक रोडवर थातुरमाथुर कारवाई करत मनपाने मोहीमच गुडाळली.
मुकुंदवाडी भागात एका युवकाच्या हत्येच्या घटनेनंतर पोलिस आणि महापालिकेने या भागातील अतिक्रमणावर हातोडा चालवला. २० जूनपासून सुरू झालेली ही मोहीम पुढे सुरूच ठेवत विविध भागांतील गोरगरिबांच्या हजारो मालमत्तांची पाडापाडी केली. यात सिडको असो की महाराष्ट्र औद्योगिक विकास (एमआयडीसी) महामंडळच्या संबंधित व्यावसायिक मालमत्ता भुईसपाट केल्या.
यावेळी नागरिकांनी सातबारा उताऱ्यासह मनपाला भरत असलेल्या कर पावतीसह कागदपत्रे दाखवली. मात्र याकडे दुर्लक्ष करत या सिंघम अधिकाऱ्यांनी त्या मालमत्तांवर बुलडोजर चालवला. दरम्यान कांचनवाडी येथील काही उद्योजक व बड्या व्यावसायिकांना कारवाईतून सूट दिली. तसेच महावीर चौक ते मोंढा नाकापर्यंतच्या कारवाईवेळी काही व्यावसायिकांना तास, दोन तासांची मुदत देत काहींना सात दिवसांचा अवधी दिला. या दुजाभाव कारवाईचा सिलसिला शुक्रवारी सकाळी मोंढा नाका ते सेव्हनहिलपर्यंतच्या कारवाईवेळीही दिसून आला. दुपारपर्यंत या रोडवरील कारवाईवेळीही काही मालमत्ता वगळून ताफा पुढे सरकला. त्यानंतर मात्र सेव्हनहिल ते सिडको बसस्थानक रोडवरील धनदांडग्यांच्या मालमत्तांसमोर मनपाने सपशेल नांग्या टाकत मोहीमच गुडांळल्याची चर्चा होती.
मुकुंदवाडी, संजयनगर, बीड बायपास, चिकलठाणा, कांचनवाडी, नक्षत्रवाडी, पडेगाव, दिल्लीगेट भागातील गोरगरिबांच्या मालमत्तांवर बुलडोझर चालवत सिंघम ठरलेले अधिकारी जालना रोडवरील कारवाईवेळी चिंगम ठरले असल्याचे दिसून आले.
मुंकुदवाडी येथील चप्पल दुकानांसह छोटे हॉटेल, टपऱ्या तसेच जिमखाना क्लब, धूत हॉस्पिटलसह चिकलठाणा भागातील काही मालमत्ता या एमआयडीसीच्या जागेवर असूनही महापालिकेने रस्त्याला बाधित ठरणाऱ्या मालमत्ता पाडल्या. मात्र जालना रोडवरील सेव्हनहिल ते सिडको बसस्थानक रोडवरील बडे व्यापारी, उद्योजकांच्या मालमत्तांवर कारवाई करताना मनपाच्या सिंघम होऊ पाहणाऱ्या अधिकाऱ्यांना अचानक नियम आठवला. या मालमत्ता एमआयडीसी हद्दीतील आहेत. तसेच शहराचा विकास आराखडा शासनाने ठरवला असून, महापालिकेकडून आज मोजणी करत त्यांना नियमानुसार नोटीस बजावली जाईल. त्यानंतर कारवाईसाठी अवधी द्यावा लागेल, अशा नियमांची या सिंघम अधिकाऱ्यांना आठवण झाली.