Municipal Corporation Standing Committee Chairman to be elected today
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेतील स्थायी समितीसह विविध विषय समितींच्या सभापतीपदासाठी आज (दि.१२) सकाळी ११ वाजता निवडणूक होणार आहे. स्थायी समितीसाठी भाजपकडून अनिल मकरिये यांनी, तर एमआयएमकडून अब्दुल मतीन खान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या सभेचे पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी काम पाहणार आहेत.
स्थायी समिती सभापतीपदासाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. बुधवारी दुपारी भाजपने ज्येष्ठ नगरसेवक अनिल मकरिये यांना उमेदवारी देत त्यांचा अर्ज दाखल केला.
तसेच एमआयएमकडून नगरसेवक अब्दुल मतीन खान यांनी अर्ज भरला आहे. स्थायी समितीमध्ये १६ पैकी सर्वाधिक ८ सदस्य भाजपचे आहेत. त्यामुळे सभापतीपदी अनिल मकरिये यांचीच वर्णी लागणे जवळपास निश्चित मानले जात आहे. मकरिये यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना महापौर समीर राजुरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, भाजपचे शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्यासह इतर नगर-सेवक उपस्थित होते.
विषय समिती सभापतींसाठीही अर्ज दाखल महापालिकेच्या महिला व बालकल्याण, शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण आणि शहर सुधार समितीच्या सभापतीपदासाठीही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
महिला व बालकल्याण समिती : सभापतीपदासाठी भाजपच्या शोभा बुरांडे व एमआयएमच्या विजयश्री जाधव यांनी अर्ज दाखल केला. उपसभापती पदासाठी ज्योती गंगवाल आणि नूरजहान इकबाल यांचा अर्ज दाखल झाला आहे.
आरोग्य समिती सभापतीपदासाठी भाजपच्या सुनीता साळुंके आणि एमआयएमचे मोहम्मद वाजेद मोहम्मद अय्युब यांच्यात लढत होईल.
शहर सुधार समिती: भाजपकडून रामदास हरणे आणि एमआयएमकडून शेख साबेर पाशू यांनी अर्ज भरले आहेत.
शालेय शिक्षण समिती : सभापतीपदासाठी शिवसेनेच्या प्रेमलता दाभाडे आणि एमआयएमकडून सय्यद उसामा अब्दुल कदीर रिंगणात आहेत.
समाजकल्याण समिती : भाजपचे जालिंदर शेंडगे आणि एमआयएमच्या सुनीता वाहूळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.