Municipal Corporation provides immersion facilities at 21 places in the city
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : उत्साहात गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी महापालिकेकडून शहरात २१ ठिकाणांवर विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये विहिरी, तलाव आणि कृत्रिम तलावांचा समावेश असून, विसर्जन स्थळांवर २४ पथक प्रमुखांसह सुमारे १०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आरोग्य कर्मचारी पथक, जीवरक्षक आणि इतर आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे.
शहरात दहा दिवस मोठ्या उत्साहात मुक्कामाला आलेल्या गणरायाला आज शनिवारी (दि.६) मोठ्या भक्तिभावाने निरोप दिला जाणार आहे. या निरोपाची महापालिकेकडून जय्यत तयारी करण्यात आली असून, शहरात २१ ठिकाणी विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी ५ फुटांपर्यंतच्या मूर्तीचे विसर्जन करण्याची सुविधा आहे. या २१ ठिकाणांव्यतिरिक्त, शहरात विविध ४१ मूर्ती संकलन केंद्रेही उभारण्यात आली आहेत. तसेच विसर्जन स्थळांवर २४ पथक प्रमुखांसह सुमारे १०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भावसिंगपुरा, भीमनगर, पडेगाव कृत्रिम तलाव, सोनेरी महल, विद्यापीठाजवळचा तलाव, बेगमपुरा, विद्युत कॉलनी कृत्रिम तलाव, पहाडसिंगपुरा, कला हाउसिंग सोसायटी कृत्रिम तलाव, औरंगपुरा, जिल्हा परिषद मैदान विसर्जन विहीर व कृत्रिम तलाव, हडको एन-१२ गणपती विसर्जन विहीर, हसूल स्मृतीवन उद्यान कृत्रिम तलाव, चिकलठाणा आठवडी बाजार कृत्रिम तलाव, राजीव गांधी स्टेडियम, एन-५ कृत्रिम तलाव, मुकुंदवाडी देवगिरी कॉलनी, संतोषी माता नगरकरिता संघर्षनगर विहीर, शिवाजी नगर विसर्जन विहीर, शहानूरमिया दर्गा कृत्रिम तलाव, वॉर्ड क्र. ९५ अंतर्गत कृत्रिम तलाव, सातारा येथील तलाव, तसेच विसर्जन विहीर, जालान नगर रेल्वे स्टेशन विहीर, कांचनवाडी कृत्रिम तलाव.