Municipal Corporation prepares to encroachment removal the road under Beed Bypass
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा:
महापालिकेकडून बीड बायपास भागातील अंतर्गत रस्त्यांवर पाडापाडीची तयारी सुरू झाली असून, बुधवारी (दि.१०) पथकाने रेणुकामाता कमान ते सोलापूर-धुळे महामार्गापर्यंतच्या रस्त्याची मोजणी करून मार्किंग केली. यात कमानीपासून उमरीकर लॉन्सपर्यंत १५ मीटर, तर त्यापुढे हा रस्ता ३० मीटरपर्यंतचा आहे. त्यामुळे एकाच रस्त्याची वेगवेगळी रुंदी दाखविण्यात आल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या रस्त्यावर पत्र्याचे शेड, ओटे, पायऱ्यांचे बांधकामाचे अतिक्रमण हटविले जाणार असून, रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
राज्य शासनाने शहराच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली असून, महापालिकेकडून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार सातारा परिसरातील रेणुकामाता कमान ते सोलापूर-धुळे महामार्गापर्यंतच्या रस्त्याची मोजणी करून मार्किंग करण्याचा निर्णय मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी घेतला. त्यावरून बुधवारी सकाळी मनपा नगररचना विभागाचे उपसंचालक मनोज गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता बाळासाहेब सिरसाट, सहायक नगररचनाकार शिवाजीराव लोखंडे पाटील, सव्र्व्हेअर दिनेश पाटील यांच्यासह मनपाचे मोजणी पथकाने रेणुकामाता कमान ते सोलापूर-धुळे महामार्गापर्यंत रस्त्याची मोजणी करून मार्किंग केली.
यात रेणुकामाता कमान ते उमरीकर लॉन्सपर्यंत हा रस्ता १५ मीटर (५० फूट) असून, त्यापुढे मात्र सोलापूर-धुळे महामार्गापर्यंत हा रस्ता ३० मीटर (१०० फूट) असा आहे. रस्त्याची मोजणी करून मार्किंग करतेवेळी या रस्त्याला अडथळा ठरणारे पत्र्याचे शेड, शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या पायऱ्या, ओटे, काही बांधकामे असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान उमरीकर लॉन्स ते सोलापूर-धुळे महामार्गापर्यंत हा रस्ता ३० मीटरचा आहे.
मात्र या पट्ट्यात बांधकामे नसल्यामुळे मार्किंगवेळी नागरिकांचा विरोध नसल्याचे दिसून आले. तसेच या रस्त्यासाठी जिल्हा नियोजन समितीने दोन कोटीचा निधी उपलब्ध करून दिला. या निधीतून रस्त्याचे व्हाईट टॉपिंग केले जाणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून, बागडे कन्स्ट्रक्शनच्या १ कोटी ५६ लाख रुपयाच्या निविदेला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र या रस्त्यावरील मार्किंगनंतर लगेचच रस्त्याच्या कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, ड्रेनेजलाईन आणि पाणीपुरवठ्याची पाईपलईन रस्त्याच्यामधूनच टाकण्यात आल्याने नागरिकांना या रस्त्यावरून पायी चालणेही अवघड झाले आहे. हा रस्ता नव्याने तयार करावा, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली होती. त्यासाठी मनपाकडे वारंवार पाठपुरावाही केला. मात्र रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी मनपा पथकाकडून या रस्त्याची विकास आराखड्यानुसार मोजणी करून मार्किंग सुरू करण्यात आली आहे.