Anti-encroachment campaign : महापालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहिमेचा धडाका file photo
छत्रपती संभाजीनगर

Anti-encroachment campaign : महापालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहिमेचा धडाका

गजानन महाराज मंदिर रोडवर हातगाड्या जप्त : एपीआय कॉर्नरवरील ग्रीन बेल्टही मोकळा

पुढारी वृत्तसेवा

Municipal Corporation launches vigorous anti-encroachment drive

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवरील वाढत्या अतिक्रमणांविरुद्ध महापालिकेच्या पथकाने सोमवारी (दि.१२) कारवाई केली. गजानन महाराज मंदिर ते पुंडलिकनगर रस्त्यावर हातगाड्या, भाजीपाला आणि फळविक्रेत्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने सायंकाळी पाचच्या सुमारास काही हातगाड्या जप्त करण्यात आल्या. त्यापूर्वी पथकाकडून जालना रोडवरील एपीआय कॉर्नर येथील ग्रीन बेल्टवरील अतिक्रमणेही हटविण्यात आली.

गजानन महाराज मंदिर ते पुंडलिकनगर रस्त्यावर नवरात्रोत्सवामुळे फेरीवाल्यांची संख्या वाढली आहे. रस्त्याच्या कडेला हातगाड्या उभ्या करून भाजीपाला आणि फळांची विक्री केली जात असल्याने वाहतुकीवर परिणाम होत आहे. याची दखल घेत महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने कारवाई केली.

मात्र, पथक पुढे गेल्यानंतर परिस्थिती पुन्हा पूर्ववत होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, जालना रोडवरील एपीआय कॉर्नर येथील ग्रीन बेल्टवरही महापालिकेने कारवाई केली. या जागेवर गेल्या २५ ते ३० वर्षांपासून तीन व्यापारी रोपे, कुंड्या, माठ आणि मूर्ती विक्रीचा व्यवसाय करीत होते.

सुमारे एक हजार चौरस फुटांहून अधिक जागेवर त्यांनी व्यवसाय थाटला होता. दरम्यान, व्हीआयपी मार्गावरील या जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिकेने तीन दिवसांपूर्वी व्यापाऱ्यांना तोंडी सूचना दिल्या होत्या. त्यावरून व्यापाऱ्यांनी सोमवारी दुपारी १२ वाजेपर्यंत सुमारे ९० टक्के सामान वाहनांतून अन्यत्र हलविले. त्यानंतर महापालिकेच्या पथकाकडून जेसीबीच्या साह्याने झोपड्या आणि इतर लहान-मोठी अतिक्रमणे हटवण्यात आली.

यापूर्वीही कारवाई, पुन्हा अतिक्रमण

या व्यापाऱ्यांवर महापालिकेडून यापूर्वीही कारवाई करण्यात आली होती. मात्र, काही काळानंतर ते पुन्हा त्याच जागेवर व्यवसाय सुरू करीत होते. आता पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी महापालिकेचे पथक या जागेवर लक्ष ठेवणार आहे. वारंवार कारवाई करूनही अतिक्रमणे पुन्हा उभी राहत असल्याने त्यावर कायमस्वरूपी नियंत्रण ठेवण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT