Municipal Corporation in action mode to clean Kham River from pollution
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा ऐतिहासिक खाम नदीला पुन्हा एकदा स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त स्वरूप देण्यासाठी सुरू असलेल्या खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या कामांना महापालिका प्रशासनाने गती दिली असून, आयुक्त अमोल येडगे यांनी शुक्रवारी (दि.२९) सकाळी प्रत्यक्ष नदीपात्राची पाहणी करून विविध कामांचा आढावा घेत संबंधित विभागांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
महापालिकेकडून खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाची कामे सुरू आहेत. शुक्रवारी सकाळी ६.३० ते ९ या वेळेत मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी पाहणी केली. या पाहणीवेळी उपआयुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख नंदकिशोर भोंबे, मुख्य उद्यान अधिकारी डॉ. विजय पाटील तसेच विशेष कार्य अधिकारी (खामनदी प्रकल्प) असदउल्ला खान उपस्थित होते.
यावेळी प्रकल्पांतर्गत पूर्ण झालेल्या तसेच प्रगतिपथावरील कामांची तपासणी करण्यात आली. यावेळी नदीपात्रातील प्रदूषण, अतिक्रमणे, कचरा व्यवस्थापन, संरक्षण भिंतींची स्थिती आणि मनुष्यबळाची कमतरता या गंभीर बाबी निदर्शनास आल्या. अनेक ठिकाणी दूषित व दुर्गंधीयुक्त सांडपाणी थेट नदीत सोडले जात असल्याचे स्पष्ट झाले.
काही नागरिकांनी अधिकृत ड्रेनेज यंत्रणेशी जोडणी न करता मलनिस्सारण व्यवस्था थेट नदीत सोडल्याचेही समोर आले. तसेच भूमिगत गटार योजनेतील तुटलेल्या चेंबरमधूनही सांडपाणी नदीपात्रात मिसळत असल्याचे दिसून आले. या प्रकारावर तातडीने नियंत्रण आणण्यासाठी संबंधित विभागांना कठोर उपाययोजना करण्याचे आयुक्त येडगे यांनी आदेश दिले.
तसेच नदीकाठावरील वसाहतींमधील कचरा संकलन काटकोरपणे करण्याबरोबरच नदीत कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईचे संकेतही आयुक्तांनी दिले आहेत. नगररचना विभाग आणि अतिक्रमण विभागाने समन्वय साधून नदीपात्रातील अतिक्रमण हटविण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या. दरम्यान, काही ठिकाणी दगडी पिचिंगची दुरवस्था झाल्याचे दिसून आल्याने पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती व मजबुतीकरणाची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.
नदीपात्रातील वाढलेली झुडपे हटवून स्वच्छता मोहीम राबविण्याच्या सूचनाही उद्यान विभागाला करण्यात आल्या आहेत. या प्रकल्पासाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी दहा कंत्राटी मजूर नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले असून, कामांना वेग देण्यासाठी अतिरिक्त पोकलेन मशीन चालक उपलब्ध करून देण्याच्याही सूचना संबंधित विभागांना करण्यात आल्या आहेत.
जनसहभागातून विशेष मोहीम
खाम नदीचे पुनरुज्जीवन हा केवळ महापालिकेचा प्रकल्प नसून पर्यावरण संवर्धनाचा व्यापक उपक्रम असल्याचे आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले. नदी स्वच्छता आणि सुशोभीकरणासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, एनसीसी तसेच सामाजिक संघटनांचा सहभाग वाढविण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.