Property Tax : थकबाकीदारांना मनपाचा दणका, १४ मालमत्ता सील file photo
छत्रपती संभाजीनगर

Property Tax : थकबाकीदारांना मनपाचा दणका, १४ मालमत्ता सील

कारवाईच्या धास्तीने दिवसभरात ५० लाखांचा कर जमा

पुढारी वृत्तसेवा

Municipal Corporation cracks down on defaulters; 14 properties sealed

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मालमत्ता कर थकविणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांविरोधात महापालिकेने कारवाईचा मोर्चा आणखी तीव्र केला आहे. झोन कार्यालयांच्या पथकांनी गुरुवारी (दि.१०) शहरातील विविध भागांत जप्तीची मोहीम राबवत १४ मालमत्ता सील केल्या. ही कारवाई सुरू असतानाच काही मालमत्ताधारकांनी थकीत कराचा भरणा केल्याने एका दिवसात महापालिकेच्या तिजोरीत ५० लाख २० हजार रुपयांचा महसूल जमा झाला. यापुढे मोठ्या थकबाकीदारांवर दर गुरुवारी आणि शुक्रवारी विशेष कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे आणि उपआयुक्त (कर निर्धारक व संकलक) विकास नवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व झोन कार्यालयांच्या पथकांनी गुरूवारी मोहीम राबविली. यात झोन क्रमांक १ मध्ये एका मालमत्तेवर सीलची कारवाई करण्यात आली. त्याचवेळी दोन मालमत्ताधारकांकडून २ लाख ५९ हजार रुपयांचा कर वसूल करण्यात आला. तसेच झोन २ मध्ये दोन, तर झोन ४ मध्ये चार मालमत्ता सील करण्यात आल्या.

यासह झोन ५ आणि ६ मध्ये प्रत्येकी एका मालमत्तेवर कारवाई झाली. या दोन्ही झोनमध्ये प्रत्येकी १ लाख ५० हजार रुपयांचा कर जमा करण्यात आला. तर झोन ७ मध्ये एका मालमत्तेला सील लावण्यात आले. दरम्यान, कारवाईच्या धास्तीने चार मालमत्ताधारकांनी तब्बल १२ लाख ४८ हजार रुपयांचा थकीत कर भरला.

झोन ८ मध्ये चार मालमत्तांवर सीलची कारवाई झाली. याठिकाणी एका मालमत्ताधारकाने २ लाख ५० हजार रुपयांचा कर भरला. अशा प्रकारे शहरातील सर्व झोनमधील पथकांच्या संयुक्त कारवाईत दिवसभरात ५० लाख २० हजार रुपयांचा मालमत्ता कर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला. यापुढे मोठ्या थकबाकीदारांकडून कर वसुली वाढविण्यासाठी ही मोहीम अधिक कठोर करण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.

थकबाकी भरा, जप्ती टाळा

मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या नागरिकांनी विलंब न करता कर जमा करावा. थकबाकी कायम राहिल्यास मालमत्ता सील करण्यासह जप्तीची कारवाई केली जाईल. यापुढे प्रत्येक गुरुवार आणि शुक्रवारी विशेष वसुली मोहीम राबविण्यात येणार असल्याने मालमत्ताधारकांनी कारवाई टाळण्यासाठी थकीत कराचा भरणा करावा, असे आवाहन आयुक्त अमोल येडगे यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT