Municipal Corporation bulldozer on 850 plots in Mitmita
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेची परवानगी न घेताच शेतजमिनींचे तुकडे करून प्लॉट विक्रीचा धंदा करणाऱ्या भूमाफियांना महापालिकेने पुन्हा दणका दिला. मिटमिटा येथील गट क्रमांक १७८ आणि १७९ मध्ये तब्बल १३ एकर क्षेत्रावर उभारलेले सुमारे ८५० अनधिकृत प्लॉट बुधवारी (दि.२) मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केले. यासह प्लॉटच्या सीमांकनासाठी उभारलेले सिमेंटचे पोलही कारवाईत हटविण्यात आले असून जमीनमालकांसह प्लॉटिंगधारकांवर गुन्हा दाखल करण्याची तयारीही प्रशासनाने केली आहे.
मिटमिटा भागातील रेल्वे पटरीच्या दक्षिणेला असलेल्या गट क्रमांक १७८ मध्ये सात एकर क्षेत्रावर सुमारे ५०० प्लॉटची आखणी करण्यात आली होती. असलम खान यांच्या मालकीच्या या जमिनीवर अजमत खान याच्याकडून प्लॉटिंग केल्याचे मनपाच्या तपासणीत आढळून आले. प्लॉटिंग करताना कोणतीही वैधानिक परवानगी न घेता प्लॉट पाडून त्यांची सर्रास विक्री सुरू असल्याची तक्रार मनपाला प्राप्त झाली होती. तसेच याच परिसरातील गट क्रमांक १७९ मध्ये ५ एकर ८ गुंठे जमिनीवर सुमारे ३५० प्लॉट पाडण्यात आले होते.
साहिल फातेमा इलियास खान यांच्या मालकीच्या या जागेवर प्लॉटच्या सीमा दाखविण्यासाठी सिमेंटचे पोल रोवण्यात आले होते. या दोन्ही ठिकाणांवरील आखीव रस्ते, प्लॉटच्या खुणा व सीमांकनाचे पोल महापालिकेच्या पथकाने उद्ध्वस्त करून संपूर्ण लेआऊटचा बोजवारा उडविला. आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार अतिक्रमण विभागाचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सहायक आयुक्त संजय सुरडकर, इमारत निरीक्षक रवींद्र देसाई, मुकेश खडसे, अशोक कदम, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि नागरी मित्र पथकाचे जवान या कारवाईत सहभागी झाले होते. ही कारवाई तीन जेसीबी आणि तीन हायवा ट्रकच्या मदतीने पूर्ण करण्यात आली.
सातारा-देवळाई, हसूल, चिकलठाण्यानंतर मिटमिटा
शहरालगतच्या शेतजमिनींवर अनधिकृत प्लॉटिंग करून त्या नागरिकांच्या माथी मारण्याचे प्रकार वाढले आहेत. सातारा-देवळाई, चिकलठाणा आणि हर्मूलनंतर आता मिटमिट्यातील मोठ्या लेआऊटवर कारवाई झाल्याने प्लॉटिंग करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
जमीनमालकांसह प्लॉटिंग करणाऱ्यांवर गुन्हा
मिटमिट्यातील दोन्ही गटांमध्ये मनपाची परवानगी नसताना प्लॉट पाडून त्यांची विक्री केल्याप्रकरणी जमीनमालकांसह प्लॉटिंग करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे अतिक्रमण विभागाचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी सांगितले.
१३ एकरांत ८५० प्लॉट
मिटमिट्यातील दोन गट क्रमांकांत तब्बल १३ एकर जमिनीवर सुमारे ८५० प्लॉट पाडण्यात आले होते. सात एकरांतील गट क्रमांक १७८ मध्ये ५००, तर ५ एकर ८ गुंठ्यांच्या गट क्रमांक १७९ मध्ये ३५० प्लॉटची आखणी करण्यात आली होती. सीमांकनासाठी सिमेंटचे पोलही उभारण्यात आले होते.