छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
महापालिका निवडणुकीसाठी चार वॉर्डाचा एक प्रभाग, या पद्धतीने प्रभाग रचना करण्यात यावी, असे आदेश बुधवारी (दि.११) नगरविकास विभागाने प्रशासनाला दिले. परंतु या आदेशात २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या गृहीत धारायची की, २०२२ ची वाढीव लोकसंख्या हेच स्पष्ट नाही. त्यामुळे प्रभाग रचनेसाठी महापालिका शासनाच्या पुढील आदे-शाच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती प्रशासकीय यंत्रणांकडून देण्यात आली आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांनी निवडणूक आयोगाकडे असलेले काही अधिकार स्वतःकडे घेतले होते. या अधिकारानुसार १० टक्के लोकसंख्या वाढीचा निर्णयही घेतला होता. याच अधिकाराचा वापर करीत महायुती सरकारने मंगळवारी प्रभाग पद्धतीचे आदेश जारी केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नगरविकास विभागाच्या आदेशात प्रभाग कशा पद्धतीने तयार करावेत, या संपूर्ण बाबींचा उल्लेख असला तरी त्यात वेळापत्रकच नाही. त्यामुळे संभ्रमावस्था आहे. हा संभ्रम पुढील आठवड्यापर्यंत निवडणूक आयोगाकडून दूर केला जाण्याची दाट शक्यता आहे.
आयोगाकडून प्रभाग रचनेबाबत स्वतंत्र अधिसूचना जारी केली जाईल. त्यामध्ये वेळापत्रकासह इतर सर्वच माहिती सविस्तर दिली जाईल. त्यानंतर प्रभाग रचनेला सुरुवात होईल, त्यामुळे सध्या महापालिका याच आदेशाच्या प्रतीक्षेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.