Municipal contract employees will not get the benefit of government holidays
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी प्रशासकांनी नवा नियम लागू केला असून, आता या कर्मचाऱ्यांना आठवड्यात फक्त एकच दिवस सुटी मिळणार आहे. शनिवारी आणि रविवारीसह शासकीय सुट्यांचा लाभ थांबविण्यात आला आहे. उर्वरित दिवशी गैरहजर राहिल्यास त्या दिवसाचा पगार कपात होणार आहे. मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र नियमावली तयार केली आहे.
महापालिकेने कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी चार निविदा अंतिम केल्या आहेत. त्यानुसार श्रेणीनुसार कंत्राटी कर्मचारी नियुक्ती केली जाणार आहेत. सध्या मनपात ८४२ कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहे. या कंत्राटींना कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणे सुटीचा फायदा मिळत होता. परंतु आता कंत्राटींना आठवड्यातून एक दिवसच सुटी दिली जाणार आहे. उर्वरित सुटीच्या दिवशी कंत्राटीला कामावर हजर राहावे लागेल.
गैरहजर राहणाऱ्या कंत्राटीचा त्या दिवसाचा पगार कपात केला जाणार आहे. कंत्राटींना आठ तास काम करावे लागेल. तसेच तातडीने बोलावल्यास हजर राहावे लागणार आहे. त्यांच्या कामाचे मूल्यमापन विभागप्रमुख करतील. हजेरी अॅपवर त्यांना हजेरी नोंदवावी लागेल, अशा सूचना प्रशासकांनी विभागप्रमुखांना दिल्या आहेत.
कंत्राटींना ओळखपत्र वापरावे लागणार महापालिकेत कार्यरत असलेले कंत्राटी कर्मचारी ओळखपत्र न घालताच सर्वत्र फिरतात. आठ तासांच्या डयूटीमध्ये त्यांना ओळखपत्र घालूनच फिरावे लागणार आहे. कारवाईच्या ठिकाणी ओळखपत्र वापरावे लागणार आहे.