मनपा आयुक्तांकडून शहरातील नाले सफाईचे आदेश File Photo
छत्रपती संभाजीनगर

मनपा आयुक्तांकडून शहरातील नाले सफाईचे आदेश

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने तयारीला वेग दिला असून, १ एप्रिलपासून सर्व नाले सफाईची कामे सुरू करण्याचे निर्देश आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

Municipal Commissioner orders cleaning of city drains

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने तयारीला वेग दिला असून, १ एप्रिलपासून सर्व नाले सफाईची कामे सुरू करण्याचे निर्देश आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिले आहेत. पूरस्थिती टाळण्यासाठी यंदा नियोजनबद्ध आणि काटेकोर अंमलबजावणीवर भर देण्यात येणार आहे.

स्मार्ट सिटी कार्यालयात सोमवारी (दि. ३०) घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत आयुक्तांनी शहरातील सर्व दहा झोनमध्ये नाले सफाईचे सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. नाले सफाई करताना वरच्या टोकापासून खालच्या दिशेने काम करण्यावर भर देत, गाळ साचण्याची समस्या टाळण्याचे निर्देश दिले. तसेच नदी व नाल्याच्या काठावरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम तातडीने हाती घेण्याचे आदेश देण्यात आले.

विशेषतः नारेगाव परिसरातील अतिक्रमणे प्राधान्याने काढून टाकण्यावर भर देण्यात आला. तसेच नदीची सीमा निश्चित करून ती स्पष्टपणे दर्शविण्यासाठी मजबूत खांब किंवा रेल्वे स्लीपरचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दरम्यान, मागील पावसाळ्यात राहुलनगर, इटखेडा व नारेगाव भागात निर्माण झालेल्या पूरस्थितीचा संदर्भ देत, त्या समस्यांची कारणे शोधून यंदा प्रभावी उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला. भविष्यात जीवितहानी टाळण्यासाठी नियोजन अधिक काटेकोर करण्याचे निर्देश देण्यात आले.

तसेच नाले सफाईच्या कामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दररोज किती मीटर नाले साफ झाले याचा अचूक अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहुळे, शहर अभियंता संजय कोंबडे, अतिरिक्त शहर अभियंता अनिल तानपुरे, कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) अमोल कुलकर्णी, सचिन वायकर यांच्यासह विभागीय वॉर्ड अभियंते उपस्थित होते.

पूर टाळण्यासाठी मनपाकडून ५ बाबींवर भर

१ एप्रिलपासून सर्व झोनमध्ये नाले सफाईची सुरुवात, अपस्ट्रीम ते डाउनस्ट्रीम पद्धतीने सफाई, नदी-नाल्यांवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम, पूरप्रवण भागांचे स्वतंत्र नियोजनससह दररोज कामाचा मीटरनिहाय अहवाल बंधनकारक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT