राहुल जांगडे : छत्रपती संभाजीनगर
मुकुंदवाडी येथे एमआयडीसीच्या इमारतीत असलेले ईएसआयसी हॉस्पिटल महागड्या खासगी फ्लॅटमध्ये हलविण्याचा घाट सुरू होता. दैनिक पुढारीने हे प्रकार समोर आणताच कामगार उपायुक्तांनी गुरुवारी (दि. ११) तातडीने बैठक बोलावून हे स्थलांतर रोखण्याचे आदेश दिले. आता एमआयडीसीच्या त्याच इमारतीची दुरुस्ती करून हॉस्पिटल तिथेच राहणार आहे.
कामगारांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना वैद्यकीय सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मुकुंदवाडी येथे एमआयडीसीच्या प्रशस्त इमारतीमध्ये मागील ४० वर्षांहून काळापासून अधिक ईएसआयसी दवाखाना क्रमांक ४ सुरू आहे. औद्योगिक असल्याने दररोज अनेक कामगार-त्यांचे कुटुंबीय उपचारासाठी येत असतात.
दरम्यान, हॉस्पिटलच्या इमारतीचे दुरुस्तीचे काम सुरू असतानाच वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. आनंद इंगळे यांनी कामगार किंवा डॉक्टरांची कोणतीही मागणी नसताना ही स्वस्त आणि सोयीची सरकारी इमारत सोडून हॉटेल ग्रॅण्ड ईकोटेलच्या बाजूच्या प्लॉट नं.पी. १६ या सुमारे ७० हजार रुपये महिना किरायाच्या महागड्या सदनिकेत हॉस्पिटल हलविण्याचा खटाटोप सुरू केला होता. तशा आशयाची नोटीसही लावली होती. यास कामगार संघटनांकडून कडाडून विरोध सुरू होता.
दै. पुढारीने हे प्रकरण समोर आणल्याने ईएसआयसी स्थायी समिती अध्यक्ष तथा कामगार उपायुक्त नितीन पाटणकर यांनी गुरुवारी तातडीने बैठक बोलावली. या बैठकीत सदस्य विनोद फरकाडे, लक्ष्मण साक्रूडकर, बुद्धीनाथ बराळ, अशोक बेडसे, भालचंद्र कांगो यांनी सर्वानुमते हॉस्पिटल एमआयडीसीच्या इमारतीतच राहिल, असे मान्य केले. त्यानुसार पाटणकर यांनी आदेश देत त्या इमारतीची दुरुस्तीसाठी पुढील जबाबदारी फरकाडे यांच्याकडे दिली.
बेकादेशीर अन् चुकीचा निर्णय रद्द - एमआयडीसीच्या जागेतून हॉस्पिटल महागड्या खासगी जागेत हलविण्याचा निर्णय बेकायदेशीर होता. हे वैद्यकीय प्रशासन अधिकाऱ्यांनी मान्य केले. कामगार हिताच्या दृष्टीने चुकीचा निर्णय समितीकडून रद्द करण्यात आला.विनोद फरकाडे, स्थायी समिती सदस्य
हॉस्पिटलचे स्थलांतर नाही - मुकुंदवाडी येथील ईएसआयसी हॉस्पिटल खासगी जागेत स्थलांतरित करण्याचा निर्णय समितीच्या बैठकीत रद्द केला आहे. आहे त्याच एमआयडीसीच्या इमारतीची दुरुस्ती, गळती थांबवण्याचे काम करून घेण्याचे बैठकीत ठरले.नितीन पाटणकर, कामगार उपायुक्त तथा अध्यक्ष, स्थायी समिती