छत्रपती संभाजीनगर : नुकतेच पनवेल आगाराच्या महिला वाहकाने कर्तव्यावर असताना द्विअर्थी गाण्यावर रील बनवली होती. या प्रकरणी तिच्यासह तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. दरम्यान, असे प्रकार पुन्हा होऊ नयेत म्हणून मंगळवारी (दि.४) एसटीच्या वतीने आदेश काढत एसटीची प्रतिमा मलिन होईल, अशा रील बनवल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
परिपत्रकानुसार, एसटी कर्मचारी कर्तव्यावर असताना अथवा वाहन चालवताना सिनेमा, गाण्यांवर आधारित रील्स, व्हिडिओ, लाईव्ह स्ट्रीमिंग, शॉर्ट्स किंवा अन्य सोशल मीडियाचा वापर करू शकणार नाहीत. तसेच गोपनीय अथवा अंतर्गत माहिती प्रसारित करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
सकारात्मक माहिती देणारे व्हिडिओ, शॉर्ट्स किंवा रील्स तयार करण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले. एसटीच्या प्रतिमेला धक्का पोहोचविणारे, नकारात्मक स्वरूपाचे अथवा जनमानसात चुकीचा संदेश जाण्याची शक्यता असलेले व्हिडिओ प्रसारित केल्यास संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल.
विभाग नियंत्रक, आगार व्यवस्थापक आणि संबंधित अधिकाऱ्यांनी अशा प्रकारांची दखल घेऊन आवश्यकतेनुसार शिस्त व अपील पद्धतीनुसार कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रशासनाची करडी नजर
सोशल मीडियावरील वैयक्तिक प्रसिद्धीपेक्षा एसटीची प्रतिमा आणि प्रवाशांचा विश्वास महत्त्वाचा असून, कर्तव्याच्या वेळेत रील्स व व्हिडिओ बनविणाऱ्यांवर आता प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. अनेक चालक-वाहक कर्तव्यावर असताना रील्स बनवत ते समाजमाध्यमांवर प्रसारित करतात. यामुळे प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात जाण्याची शक्यता लक्षात घेऊन हे आदेश देण्यात आले आहेत.
सोशल मीडियासाठी कर्मचाऱ्यांना डोस
कर्तव्यावर रील्स, व्हिडिओ, शॉर्ट्स, लाईव्ह स्ट्रीमिंगवर बंदी
गोपनीय व अंतर्गत माहिती प्रसारित करता येणार नाही
प्रतिमा खराब करणारी सामग्री प्रसारित केल्यास कारवाई
सकारात्मक व्हिडिओ किंवा रील्ससाठी पूर्वपरवानगी आवश्यक
नियमांचे उल्लंघन केल्यास शिस्तभंगाची कारवाई