Kannad Taluka Married Woman molestation case
नाचनवेल : कन्नड तालुक्यातील डोंगरगाव आग्रे येथील एका २१ वर्षीय विवाहित महिलेवर तिच्याच नात्यातील व्यक्तीने प्रेमाच्या भूलथापा देऊन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पिशोर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता लोखंडे करत आहेत.
फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. १५ जुलै रोजी दुपारच्या सुमारास पीडिता त्यांच्या राहत्या घरी एकट्या होत्या. यावेळी आरोपी निवृत्ती भगवान आग्रे (रा. डोंगरगाव) यांनी फिर्यादीच्या घरी येत, "माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू मला खूप आवडते" असे म्हणत विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने त्यास विरोध करत घराबाहेर जाण्यास सांगितले असता, आरोपीने तिला फोनवर बोलण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला.
त्यावर फिर्यादीने स्पष्ट नकार दिल्यावर आरोपीने जबरदस्तीने हात धरून, झटापट करून पलंगावर फेकले व लज्जा भंग करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने आरडाओरडा केल्यावर आरोपीने "ही गोष्ट कोणाला सांगितलीस तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला जिवंत ठेवणार नाही," अशी धमकी दिली तसेच शिवीगाळ केली. या प्रकरणी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.