MLA Sanjana Jadhav: Remove technical problems in MNREGA
कन्नड, पुढारी वृत्तसेवा: कन्नड व सोयगाव तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) कामांमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे हजारो मजूर रोजगारापासून वंचित राहत असल्याचा गंभीर मुद्दा आमदार संजना जाधव यांनी विधानसभेत उपस्थित केला. मनरेगा कामांतील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून सर्व पात्र मजुरांना १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.
आ. जाधव म्हणाल्या की तालुक्यात सिंचन विहिरी, गोठे तसेच मृद व जलसंधारणाची अनेक मंजूर कामे तांत्रिक कारणांमुळे रखडली आहेत. तांत्रिक सहायकांचा संप, ऑनलाइन प्रणालीतील त्रुटी आणि कनिष्ठ अभियंत्यांवरील अतिरिक्त कामाचा ताण यामुळे ई-मस्टर वेळेत तयार होत नसल्याने हजारो मजुरांना रोजगार मिळत नाही. परिणामी सुमारे ५,५०० मजूर रोजगार हमी योजनेंतर्गत मिळणाऱ्या १०० दिवसांच्या रोजगारापासून वंचित असल्याचा आरोप त्यांनी केला.
सोयगाव तालुक्यातही मंजूर कामे सुरू न होणे, सर्व्हर डाऊन होणे, ऑनलाइन प्रणालीतील तांत्रिक बिघाड आणि प्रशासकीय दिरंगाई यामुळे मजुरांना रोजगारासाठी स्थलांतर करावे लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच सर्व प्रलंबित कामे तातडीने सुरू करून मजुरांना नियमित रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
यावर उत्तर देताना रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले की, कन्नड तालुक्यात नवीन ई-एमबी प्रणाली लागू करताना सुरुवातीला काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे तयार करण्यात आलेली ४३१ ई-मस्टर रद्द करून नव्याने ई-मस्टर तयार करण्यात आले. त्यानंतर मजुरांच्या मागणीनुसार रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.
संपाच्या काळात अधिकाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले होते. मात्र, त्या कालावधीत मजुरांकडून कामाची मागणी प्राप्त झाली नसल्याने नवीन ई-मस्टर तयार करण्यात आले नव्हते. ज्या ठिकाणी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या त्या दूर करण्यात आल्या असून, नव्याने ई-मस्टर तयार करून मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे मंत्री भरत गोगावले यांनी सभागृहात स्पष्ट केले.