Misappropriation of Rs 73 lakhs on trader's mutual GST number
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बीडच्या गेवराई येथील व्यापाऱ्याच्या जीएसटी नंबरला स्वतःचा मोबाईल नंबर आणि ई-मेल रजिस्टर करून कर सल्लागाराने तीन वर्षांत परस्पर तीन ट्रेडिंग कंपन्यांसाठी कोट्यवधींचे व्यवहार केले. ७३ लाख ६३ हजार ३६७ रुपयांचा गैरव्यवहार करून फसवणूक केली. व्यापाऱ्याला आयकर विभागाची नोटीस, समन्स आल्यानंतर प्रकार उघडकीस आला. हा प्रकार २०२२ ते २०२५ या काळात मालन प्लाझा, जवाहर कॉलनी भागात घडला.
गोविंद सत्यनारायण लाहोटी (रा. राजयोग प्राईड, देवळाई परिसर) असे आरोपी कर सल्लागाराचे नाव आहे. फिर्यादी मधुसूदन चतर्भुज सोनी (५१, रा. गेवराई, जि, बीड) यांचा गोळ्या बिस्कीट व पान मटेरियलचा व्यवसाय असून, श्री राजुरेश्वर ट्रेडर्स नावाने गेवराई येथे दुकान आहे. आरोपी कर सल्लागार गोविंद लाहोटी याच्याकडे त्यांनी २०१७मध्ये वस्तू व सेवा कराचे जीएसटी प्रमाणपत्र काढले होते. तेव्हा लाहोटीने नोंदणीसाठी स्वतःचा मोबाईल नंबर आणि ई-मेल वापरला होता. त्यानंतर सोनी यांचे सर्व आर्थिक व्यवहाराचे काम लाहोटीकडे दिले होते. नोव्हेंबर २०२४ रोजी सोनी याना आयकर विभागाचे समन्स व नोटीस आली. त्यात जीएसटी नंबरवरून होणारे व्यवहार लक्षात आले. त्यांनी बीडच्या आयकर कार्यालयातून पत्र देऊन स्वतःचा मोबाईल नंबर आणि ई-मेल नोंदवून घेतला. लाहोटी याला संपर्क केला तेव्हा त्याने गैरव्यवहार केल्याचे सांगून सर्व डिमांड निल करून देतो, असे कबूल केले.
मात्र नंतर त्याने मोबाईल बंद करून टाकला. वारंवार संपर्क केल्यानंतर त्याने पोलिसांत तक्रार केली तरी माझ्या मागेच फिरावे लागेल, अशी धमकी दिली. ६ जा-नेवारी २०२५ रोजी आयकरची दुसरी नोटीस आली. १० जानेव ारीला समन्स आले. लाहोटी उडवाउडवी करू लागला.
सोनी यांचे लाहोटीने सीए नेतल खटोड अँड कंपनी यांच्यामार्फत चुकीचे २०२१-२४ पर्यंत अशी तीन वर्षांचे आयकर विवरणपत्र परस्पर भरून घेतले. सोनी याना व्यवसायात आजपर्यंत कधीही आयकर लागला नव्हता. मात्र लाहोटीने १ लाख ३७ हजार ३४५ एवढा आयकर २०२३-२४ मध्ये भरलेला आहे. तो सोनी यांनी दोघांनाही दिलेला नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सोनी यांनी फेब्रुवारी महिन्यात पोलिस आयुक्तांकडे तक्रार दिली होती. त्यानंतर गुरुवारी (दि.७) जवाहरनगर पोलिस ठाण्यात लाहोटी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाहोटीने सोनी यांच्या परस्पर ध्रुव ट्रेडिंग, एम.एम. ट्रेडिंग, ग्लोबल ट्रेडिंग अँड कंपनी व इतर यांच्या नावांवर आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये बनावट खरेदी रक्कम ८३ लाख दाखवून १६ लाखांचा जीएसटी, २०२४-२५ मध्ये १ कोटी ३५ लाख आणि त्यावर ३५ लाखांचा गैरव्यवहार केला. २०२२-२३ मध्ये ९१ लाख ५५ हजार त्यावर २१ लाख ७० हजार, २०२३-२४ मध्ये १ कोटी ६७ लाखांवर ३८ लाखांचा जीएसटी असा सोनी यांच्या जीएसटीवरून ७३ लाखांचा गैरव्यवहार केला.