छत्रपती संभाजीनगर : माझ्या वडिलांचे अनेक मंत्री ओळखीचे असून, मंत्री दादा भुसे यांच्या नावे तरुणाला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तिघांनी साडेपाच लाख रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार १८ मे ते ३ सप्टेंबरदरम्यान शिवाजीनगर भागात घडला. रोहन विनोद जाधव आणि त्याचे दोन साथीदार अशी आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी सौरभ बालाजी वाघ (२१, रा. सराटी, ता. सिल्लोड) याच्या तक्रारीनुसार, तो शिक्षण घेत असून, शिवाजीनगर भागात रूम करून राहतो. मेहरसिंग नाईक कॉलेजजवळ पार्ट टाइम जॉब करताना आरोपी रोहन जाधवसोबत ओळख झाली. त्याने वडील सरकारी बँकेत व्यवस्थापक असल्याचे सांगून अनेक मंत्री त्यांच्या ओळखीचे असल्याची थाप मारली. मामाही सरकारी नोकरीला असन, ७ लाख रुपये दिले तर वन विभागात नोकरी लावतो, असे आमिष दाखविले. सहा लाखांत फायनल झाल्यानंतर रोहनने काम नाही झाले तर जागीच पैसे परत देऊन टाकीन, अशी हमी देत स्वतः दादा भुसे मंत्री आहेत, पैसे दे तुझे काम करून देतो. थेट मंत्र्यांच्या हातून कॉल लेटर देईल, अशा बढाया मारल्या. शैक्षणिक कागदपत्रे आणि सुरुवातीला ५० हजारांची मागणी केल्याने पैसे आणि कागदपत्रे दिले. सौरभ गावाकडे गेल्यानंतर आरोपी रोहन कार्तिक जाधवची कार घेऊन दोन
साथीदारांसह त्याच्या घरी गेला. घरच्यांशी बोलून आणखी ५० हजार घेतले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने रोहनने कधी रोखीने तर काही रक्कम त्याची आई आणि मित्र गोकुळ प्रधान, ऋषिकेश पवार यांच्या खात्यावर घेतले. सौरभ काम करत असलेल्या प्रिशा डेकोरेशनचे मालक सुनील कापरे यांच्याकडून १ लाख घेऊन रोहनच्या आईला ऑनलाईन पाठवले होते. रोहन जाधवला एकूण ५ लाख ५० हजार दिले होते.
दादा भुसेंना भेटायचे म्हणून नेले मुंबईला
आपल्याला मंत्री दादा भुसे यांना भेटण्यासाठी मुंबईला जावे लागेल, असे सांगून ९ जुलैला रात्री आरोपी रोहन आणि त्याचा मित्र कार्तिक गिरी असे तिघे कारने मुंबईला गेले. चर्चगेट येथे सौरभला सोडून दोघे जण तुझे काम करून येतो म्हणून निघून गेले. तीन तासांनी परत आल्यावर रोहनने ४० हजार लगेच पाठव नाही तर काम होणार नाही, असे म्हटले. मात्र सौरभने माझ्याकडे आता पैसे नाहीत, असे सांगून रेल्वेने संभाजीनगरला निघून आले.