

वाळूज महानगर ( छत्रपती संभाजीनगर ) : तलाठी पदाच्या नोकरीचे आमिष दाखवून दोघा जणांकडून प्रत्येकी १० लाख असे एकूण २० लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उद्धव नरवडे (५५, रा. न्यू श्रीरामनगर, रांजणगाव) यांनी अडीच वर्षांपूर्वी त्यांचे रांजणगाव येथील घर कोमल सावके व तिचा मुलगा गणेश यांना किरायाने दिले होते. काही दिवसांनी एक इसम महिलेसोबत लग्न केले आहे, असे म्हणून तो तिच्या सोबत राहू लागला. त्याने त्याचे नाव बबनराव देवकाते, असे असून तो मंत्रालयात नोकरीला असल्याचे सांगितले. देवकाते यांनी अनेक मुलांना सरकारी नोकरी लावली असल्याचे कोमल सावके हिने नरवडे यांना सांगितले होते. यावेळी देवकाते यानेही शासकीय नोकरी किंवा कोणाचे बदलीचे काही काम असल्यास मला सांगा ते मी करून देतो, तेव्हा नरवडे यांनी त्यांचा मुलगा दीपक हा कंपनीत कामाला जातो. त्याला जर सरकारी नोकरी मिळत असेल तर सांगा. त्यावर देवकाते याने सध्या तलाठी पदाची जाहिरात आली आहे. यासाठी त्याला अर्ज करण्यास सांगा मी त्याला परीक्षेत मदत करून त्याच्या नोकरीचे काम करून देतो. मात्र यासाठी तुम्हाला मला १५ लाख रुपये द्यावे लागतील, असे आमिष दाखविले. मुलाला सरकारी नोकरी लागणार, या आशेमुळे नरवडे यांनी त्यास पैसे देण्याची तयारी दर्शविली.
नोकरीसाठी सुरुवातीला ५ लाख रुपये व उर्वरित १० लाख रुपये नोकरीचे नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर द्यावे लागतील, असे सांगितल्याने नरवडे यांनी काही रक्कम रोख तसेच वेगवेगळ्या फोन पे वरून असे एकूण ५ लाख रुपये देवकाते यास दिली होती. दीपकचा मित्र प्रदीप सवई यानेही तलाठी पदासाठी अर्ज भरला होता. देवकाते हा पैसे घेऊन नोकरी लावून देतो, असे प्रदीपला समजल्याने एका नातेवाइकाला सोबत घेऊन त्याने देवकाते याची भेट घेऊन माझेसुद्धा नोकरीचे काम करून द्या, असे त्यास सांगितले. तेव्हा देवकाते याने त्यांना तुम्ही अगोदर १० लाख रुपये जमा करा व काम झाल्यानंतर ५ लाख रुपये देण्यास सांगितले. प्रदीप याने देवकाते यास रोख १० लाख रुपये दिले होते. दरम्यान, देवकाते याने नरवडे यांना तुम्हाला आणखी ५ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितल्याने नरवडे यांनी त्यास ५ लाख रुपये दिले होते.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच उद्धव नरवडे यांनी अनेकदा त्यास फोन करून पैसे वापस मागितले, मात्र आज देतो-उद्या देतो अशी टाळाटाळ त्याने सुरू केली. या प्रकरणी उद्धव नरवडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात बबनराव देवकाते व कोमल सावके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेटिंगमध्ये तुमचे काम
तलाठी परीक्षेचा निकाल लागला तेव्हा दीपक नरवडे व प्रदीप सवई यांची नावे कुठेच दिसली नाही. यामुळे उद्भव नरवडे यांनी देवकाते याच्याकडे विचारणा केली असता थोडे थांबा साहेबांना सांगितले असून, वेटिंगमध्ये तुमचे काम करून देतो, असे त्याने सांगितले.