Temperature Drop : किमान तापमान घसरले, पारा १०.२ अंशांवर File Photo
छत्रपती संभाजीनगर

Temperature Drop : किमान तापमान घसरले, पारा १०.२ अंशांवर

गारवा वाढला : कडाक्याच्या थंडीमुळे पेटल्या शेकोट्या

पुढारी वृत्तसेवा

Minimum temperature drops, mercury at 10.2 degrees

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

शहर व परिसराच्या किमान तापमानात मोठी घसरण झाली असून, हुडहुडी भरवणारी थंडी वाढली आहे. चिकलठाणा वेधशाळेने नोंदविलेल्या आकडेवारीनुसार रविवारी (दि.३०) शहराचा किमान पारा तब्बल १०.२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. यंदाचे आतापर्यंतचे हे सर्वात कमी तापमान असून, गेल्या काही दिवसांपासून तापमानात होत असलेली चढ-उताराची मालिका सुरू आहे. थंडीचा कडका वाढला असल्याने शेकोट्यांचा आधार घेतला जात आहे.

शहर व परिसरात गेल्या आठवडाभरात थंडी गायब झाल्याने उन्हाचा चटका वाढला होता. मात्र रविवारी पहाटेपासूनच अचानक गारवा वाढल्याने बोचरी थंडी प्रकर्षाने जाणवू लागली आहे. दरम्यान, आकाश स्वच्छ आणि वातावरण कोरडे असल्याने सूर्यास्तानंतर तापमान वेगाने कमी होत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत किमान तापमान दोन ते तीन अंशांची घट नोंदवली गेली आहे. हवेत ओलावा कमी व वाऱ्याचा वेग मंद असल्याने रात्रीचा गारवा अधिक वाढला आहे.

केवळ शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही किमान तापमानात घसरण झाली आहे. काही भागांत पहाटे १० अंशांच्या आसपास तापमान नोंदवले जात असून, धुक्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवस तापमानात आणखी घसरण होऊ शकते. कमाल तापमान २९ ते ३० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १० ते १२ अंशांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. तर रविवारी शहरात किमान तापमान २९.२ तर किमान तापमान १०.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले असून, यंदाचे हे सर्वात कमी तापमान असल्याचे हवामान तज्ज्ञांकडून मानले जात आहे. यावरून आता रात्री वाढणारा गारवा आणि पहाटेच्या थंड हवेत वाढ होणार असून, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

काळजी घेण्याचे आवाहन

हवामानातील अचानक बदलामुळे लहान मुले, वृद्ध आणि दमा व सर्दी-खोकला असलेल्या लोकांनी विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे. सकाळ-संध्याकाळ उबदार कपडे वापरणे, थंड वारे टाळण्यासाठी शरीर उबदार ठेवणे आणि पुरेसे पाणी पिणे यासारख्या उपायांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. थंडीत वाढ झाली असून, तापमानातील तफावत वाढते आहे. त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती ढासळण्याची शक्यता अधिक असल्याने काळजी घेण्याचे आवाहान तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.

रात्रीच्या थंड हवेत वाढ

गेल्या काही आठवड्यांपासून थंडीचे आगमन लांबले होते. मात्र आता वातावरणातील बदल स्पष्टपणे जाणवत असून, सकाळच्या धुरकट प्रकाशात, मंद गार वाऱ्यात आणि रात्रीच्या थंड हवेत वाढ होत आहे. किमान तापमानातील आजची लक्षणीय घट हा येत्या दिवसांत पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीचा इशारा मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT