AIMIM has announced the list of twelve candidates.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
महापालिका निवडणुकीसाठी एकीकडे भाजप, कॉंग्रेस आणि दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससह वंचित बहुजन आघाडीकडून अद्यापही इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीच सुरू आहेत. तर दुसरीकडे एमआयएमने इच्छुकांच्या मुलाखती घेत रविवारपर्यंत १२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करीत शहरात बाजी मारली आहे.
महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या एमआयएमकडे यंदा सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. शहरात मुस्लिमबहुल भागात मोडणार्या प्रभागांची संख्या ९ ते १० असली तरी यंदा एमआयएमने दलित आणि हिंदूबहुल भागावरही लक्ष केंद्रित केले आहे.
त्यामुळे शहरात भाजप, दोन्ही शिवसेनेनंतर इच्छुकांची लांबलचक रांग असलेल्या पक्षांमध्ये एमआयएम चौथ्या क्रमांकावर आहे. एमआयएमकडे तब्बल ४०० इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. यात सर्वाधिक मागणी ही मुस्लिमबहुल भागांतील प्रभागांमध्ये आहे.
दरम्यान, शहरातील दलित आणि हिंदूबहुल भागातील प्रत्येक प्रभागामध्ये एका जागेसाठी किमान चार ते पाच इच्छुक असल्याचा दावा एमआयएमने केला आहे. त्यानुसार २९ पैकी सुमारे १८ ते २० प्रभागांतील ७२ ते ८० जागांवर उमेदवार देण्याची तयारी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.
त्यापैकी पहिल्या १२ उमेदवारांची यादी प्रदेशाध्यक्ष जलील यांनी राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या आदेशाने जाहीर केली आहे. यात काँग्रेसमधून एमआयएममध्ये दाखल झालेले हजी शेर खान वगळता सर्वच नव्या चेहऱ्याचा समावेश आहे.