Vaijapur News : गावागावांत परप्रांतीयांचे लोढे, वैजापूर पोलिसांत झिरो नोंद  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Vaijapur News : गावागावांत परप्रांतीयांचे लोढे, वैजापूर पोलिसांत झिरो नोंद

महिला कीर्तनकाराच्या हत्येनंतर धक्कादायक वास्तव समोर आले

पुढारी वृत्तसेवा

migrants in villages, zero registration with Vaijapur police

नितीन थोरात

वैजापूर : आठ दिवसांपूर्वी दोन परप्रांतीय चोरट्यांनी महिला कीर्तनकाराची हत्या केली. ही घटना चार दिवसांपूर्वी उघडकीस आली. विशेष म्हणजे मागील काही वर्षांपासून शेती असो वा व्यवसाय, मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजूर तालुक्यात आले आहेत.

अनेकांनी शहरासह ग्रामीण भागात घरे भाड्याने घेऊन वर्षानुवर्षे वास्तव्यास सुरुवात केली आहे. मात्र याबाबत वैजापूर उपविभागातील कोणत्याही पोलिस ठाण्यात एकही नोंद नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यावरून पोलिस प्रशासन किती मसतर्कफ आहे, हे स्पष्ट होते.

कुठल्याही परराज्यातील अनोळखी व्यक्तीला घर भाड्याने देताना किंवा व्यवसायासाठी कामावर ठेवताना, संबंधितांचे आधारकार्ड व अन्य कागदपत्रे पोलिस ठाण्यात सादर करून नोंदवणे आवश्यक असते, असे प्रशासन सांगते. मात्र, हा नियम न घरमालक पाळतात, न व्यापारी, न शेतकरी. पोलिस प्रशासनही याबाबत जागरूक नसल्याचे वारंवार समोर आले आहे. त्यामुळे हे नियम केवळ कागदोपत्रीच आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतो.

ना जनजागृती ना नोंद

गेल्या काही वर्षांत तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत. यामध्ये बहुतेक वेळा परप्रांतीय आरोपी आढळले आहेत. तरीही पोलिसांनी कुठल्याही प्रकारची जनजागृती केलेली नाही, की कुठलीही अधिकृत नोंद त्यांच्या नोंदवहीत आढळत नाही. वैजापूर उपविभागातील वैजापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ५८, शिऊर ठाण्याच्या हद्दीत ६३, व वीरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत ४३ गावे आहेत. परंतु तिन्ही ठाण्यांत परप्रांतीय मजूर, फेरीवाले किंवा नव्याने आलेल्या भाडेकरूंबाबत कोणतीही नोंद नाही. तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाकडेही कोणताही तपशील उपलब्ध नाही, हे तालुक्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे. यावर वरिष्ठांनी त्वरीत लक्ष देणे गरजेचे आहे.

आतापर्यंत नोंद नाही, ही बाब खरी आहे. मात्र मी तिन्ही पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना माहिती संकलनाचे लेखी आदेश दिले आहेत. त्यांनी आपल्या स्तरावर माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनीही परप्रांतीय शेतमजूर कामावर ठेवताना पोलिसांना कळवावे. त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून मूळ गावातील त्याला ओळखणाऱ्या सरपंच किंवा पोलिस पाटलांचे मोबाईल क्रमांक घ्यावेत.
भागवत फुंदे,उपविभागीय पोलिस अधिकारी, वैजापूर

पोलिस पाटील यांनी लक्ष देणे गरजेचे

गावातील शांतता राखणे, कुठलीही घटना तात्काळ पोलिसांना कळवणे हे पोलिस पाटलांचे मुख्य कार्य आहे. त्यासाठी त्यांना मानधनही दिले जाते. मात्र तालुक्यातील कोणत्याही पोलिस पाटलांनी परप्रांतीयांविषयी माहिती गोळा करण्याचे अथवा पोलिसांना कळवण्याचे काम केलेले नाही. पोलिस पाटील यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

घरमालकांसोबत पोलिसांचे दुर्लक्ष

उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे परप्रांतीयांची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. वैजापूर, शिऊर आणि वीरगाव या तिन्ही पोलिस ठाण्यांतही हीच स्थिती आहे. त्यामुळे केवळ घरमालकांना जबाबदार धरून उपयोग नाही. जेव्हा पोलिसच दुर्लक्ष करतात, तेव्हा सामान्य नागरिकांकडून काय अपेक्षा ठेवणार?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT