पैठण : पैठण शहरातील वीट भट्टीवर मजुरी काम करणाऱ्या मजुरांनी मासे, चिकन खाल्ल्याने विषबाधा झाल्याची घटना घडली. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला तर २० जण बाधित झाल्याने त्यांच्यावर पैठण येथे शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या मजूर महिलेचे नाव ललिता प्रेमलाल पालविया (वय ३३, मध्यप्रदेश) असे आहे.
अधिक माहिती अशी की, पैठण शहरालगत असलेल्या वीट भट्टीवर मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय महिला-पुरुष कामगार असून या मजुरांनी आठवडे बाजारातून नेहमीप्रमाणे मासे, चिकन अंडे खरेदी करून जेवण बनवले होते. उरलेले शिळे अन्न या मजुरांनी खाल्ल्यामुळे रविवारी त्यांना अचानक मळमळ, उलटी, चक्कर येणे असा त्रास सुरू झाल्यामुळे मजुरांमध्ये एकच खळबळ उडवून भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या प्रकारामुळे बाधित झालेल्या मजुरांना वीट भट्टी मालकांनी तातडीने उपचारासाठी पैठण शहरातील शासकीय रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेमध्ये ललिता प्रेमलाल पालविया या महिला मजुराचा मृत्यू झाला. इतर बाधित मजुरांना शासकीय रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या या मजुरांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिले असून यासंदर्भात पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी घटनेची नोंद केली आहे. पुढील तपास सुधीर ओव्हळ हे करीत आहे.