

पिंपरी : शाहूनगर येथील अभय कोटकर यांच्या शिक्षण महर्षी डॉ. डी. वाय. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमधील ३० विद्यार्थ्यांना सँडविच खाल्ल्याने विषबाधा झाली आहे. यासर्वांना उलटी आणि मळमळीचा त्रास जाणवू लागल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
उपचारानंतर काही विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले आहे. शाळेमध्ये सकाळी ११ च्या दरम्यान इयत्ता ५वी आणि ६वीच्या वर्गामधील ३३० विद्यार्थ्यांचे कुकिंग सेशन सुरू होते. तासांमध्ये शिक्षकांनी काकडी, टोमॅटो, कांदा, रेड सॉस आणि हिरवी चटणी यापासून बनविलेले ब्रेड सँडविच विद्यार्थ्यांना खायला दिले.
खाल्यानंतर काही विद्यार्थ्यांचे पोट दुखून अचानक उलट्या सुरू झाल्या. शाळा प्रशासनाने त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केल्याने ताबडतोब उपचार करता आले. दरम्यान, या वेळी रुग्णालयात पालकांनी मोठी गर्दी केली. पोलिस आणि फॉरेन्सिक लॅबच्या कर्मचाऱ्यांनी शाळेतील पदार्थांचे नमुने घेतले आहेत. सैंडविच ब्रेड खराब असल्याचे स्पष्टीकरण शाळा प्रशासनाने दिले आहे.
विषबाधा झाल्याने मुलांना रुग्णालयात दाखल केल्याचे आम्हाला शाळा प्रशासनाकडून कळाले नाही. स्कूलबस परत आली; मात्र मुले घरी आली नाही. त्यावेळी बस चालकाने घडलेला प्रकार सांगितला. त्यांनतर आम्ही लगेचच रुग्णलयात आलो, असे पालकांनी सांगितले.
घटना घडल्यानंतर डॉ. डी. वाय. पाटील यांच्या नावाशी सबंधित इतर शाळांमध्ये चौकशीसाठी फोन जावू लागले. मात्र, ही घटना घडलेल्या या शाळेचा पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ आणि डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटी अंतर्गत येणार्या शिक्षण संस्थांशी कोणताही संबंध नाही, हे स्पष्ट झाले.
आम्ही शाळेला भेट देवून सर्व परिस्थितीची पाहणी केली. त्याचा अहवाल शिक्षण संचालनालयाकडे पाठविला आहे. राज्य सरकारने देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. आता प्रयोगशाळा तपासणीचे रिपोर्ट आल्यानंतर, त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.
संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, पिं.चि. मनपा शिक्षण विभाग
इयत्ता पाचवी, सहावीच्या विद्यार्थ्यांचे कुकींग सेशन होते. शिक्षकांनी तयार केलेले सँडविच विद्यार्थ्यांना खायला दिले. त्यांनतर त्यांना उलट्यांचा त्रास सुरु झाल्यावर लगेचच त्यांना रुग्णालयात दाखल केले. ३३० विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनीही हे सँडविच खाल्ले होते. मात्र त्यातील ३० विद्यार्थ्यांना हा त्रास झाला.
अभय कोटकर, (अध्यक्ष, शिक्षण महर्षी डॉ. डी. वाय. पाटील संस्था)