Meeting with Pakistan's ISI officials should be disclosed: Prakash Ambedkar
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : भाजप सरकार एकीकडे पुलवामाचा बदला घेतल्याचे सांगते, तर दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रवक्ते राम माधव श्रीलंकेत पाकिस्तानच्या आयएसआयच्या अधिकाऱ्यांची भेट घेतात. राम माधव यांना चर्चा करण्याचा अधिकार कोणी दिला.
याचा खुलासा सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावा. अन्यथा, ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या आरएसएस आणि आयएसआय या जुळ्या बहिणी असल्याचे सिद्ध होईल, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी (दि. २१) पत्रकार परिषदेत केले.
परभणी येथील सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ सूर्यवंशी हत्याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. यानिमित्त अॅड. आंबेडकर शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी सुभेदारी विश्रामगृह येथे माध्यमाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपच्या धोरणावर टीका केली. ज्या ज्या वेळेस पाकिस्तान अडचणीत असतो, तेव्हा तेव्हा भाजपच्या चुकीच्या धोरणांची त्यांना मदत झाली आहे. आग्रा येथील जनरल मुशर्रफ आणि अटलबिहारी वाजपेयी यांची भेट असो की व्हिएतनाम भेटीचे धोरण असो. दहशतवादाचे माहेरघर असलेल्या पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी जगभरातील देश प्रयत्नशील असताना भाजप सरकार मात्र भेटीगाठी करत होता असाही आरोप यावेळी केला.
चार मुद्द्यांचा खुलासा करावा
संघाचे प्रवक्ते राम माधव आणि आयएसआच्या पतौडी नावाच्या अधिकाऱ्याला भेटल्याची माहिती आहे. या भेटीत चार मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. या चार मुद्द्यांचा खुलासा पंतप्रधानांसह मोहन भागवत यांनी करावा. अशी मागणी आंबेडकर यांनी केली. सरकारला विद्यार्थ्यांशी बोलायला वेळ नाही, मात्र आयएसआयशी बोलायला वेळ आहे. या भेटीचा खुलासा सरकारने केला नाही तर देशभक्त आणि देशद्रोही कोण याची लोकांना जाणीव होईल.
काँग्रेसला कार्यालय बंद करायाची वेळ
दुर्दैवाने, देशातील प्रमुख विरोधी पक्ष या मुद्द्यावर बोलायला तयार नाही. ते काम सध्या वंचित बहुजन आघाडी करत आहे. काँग्रेसला आपले कार्यालय बंद करण्याची वेळ आली आहे, असे आंबेडकर म्हणाले. यावेळी नगरसेवक अमित भुईगळ, अफसर खान, मेघानंद जाधव, रूपचंद गाडेकर, डॉ. रामेश्वर तायडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.