MCA Student Exam Case: Complaint to Chief Minister Devendra Fadnavis about Sai Institute
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा चिकलठाणा एमआयडी परिसरातील साई इन्स्टिट्यूट अॅण्ड फार्मसी कॉलेज या संस्थेने विद्यार्थ्यांची फसवणूक करून त्यांचे एमसीएचे वर्ष वाया घातले आहे. या महाविद्यालयांवर कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने शुक्रवारी (दि.५) मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे केली. महाविद्यालयावर कडक कारवाई करून विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ देणार नाही, असे आश्वासन दिल्याची माहिती शहर जिल्हाध्यक्ष राहुल दांडगे यांनी दिली.
युवा मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विमानतळावर भेट घेऊन साई इन्स्टिट्यूटच्या विरोधात निवेदन दिले. या निवेदनात विद्यार्थ्यांकडून प्रवेश शुल्क आकारूनही त्यांची नोंदणी विद्यापीठाकडे केली नाही.
त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मुकावे लागले. १३३ विद्यार्थ्यांचे एमसीएचे वर्ष वाया गेले आहे. त्यामुळे साई इन्स्टिट्यूटची मान्यता तात्काळ रद्द करावी, संबंधित संस्था चालकांवर गंभीर गुन्ह्यांतर्गत कारवाई करावी, १३३ विद्यार्थ्यांचे भवितव्य अबाधित राहण्यासाठी तातडीने पर्यायी व्यवस्था करावी, विद्यार्थ्यांची घेतलेली रक्कम पूर्णपणे परत करावी आदी मागण्या केल्या. या गंभीर प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असून, लवकरच याची माहिती मागवून त्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन युवा मोर्चाला दिले.