

There are 3 lakh houses in the city and only 1.49 lakh water connections.
अमित मोरे
छत्रपती संभाजीनगर शहरात मागील २० वर्षांत मोठमोठे गृहप्रकल्प तयार झाले आहेत. लोकसंख्याही १८ लाखांवर गेली आहे. परंतु महापालिकेच्या रेकॉर्डवर अजूनही घरगुती आणि व्यावसायिक नळ कनेक्शनचा आकडा १ लाख ४९ हजार एवढाच आहे. त्यामुळे महापालिका पाणीपुरवठा विभागाने प्रत्येक वसाहतीतील नळ कनेक्शनचे सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला आहे. यात अधिकृत आणि अनधिकृत अशा दोन्ही कनेक्शनचा नवा रेकॉर्ड तयार केला जाणार आहे, त्यासाठी लाईनमनसह पथक नियुक्त केले आहेत.
शहराची हद्द मागील दोन दशकांत चारही बाजूंनी वाढली आहे. शिवाय जुन्या शहरातही मालमत्तांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढली आहे. अनेक अपार्टमेंट तयार झाले आहेत. त्यामुळे घरांची संख्या तीन पटीने वाढली असून, लोकसंख्याही ७ लाखांहून १८ लाखांवर पोहोचली आहे. मात्र शहरातील नळ कनेक्शनची संख्या अतिशय कमी प्रमाणात वाढली आहे. महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या रेकॉर्डवर आज ३ लाख १५ हजार घरे आहेत. शिवाय, बहुतांश घरांना अजूनही महापालिकेकडून कर झालेली नाही.
मात्र महापालिकेकडे अधिकृत नळ कनेक्शनधारकांची संख्या ही १ लाख ४९ हजार ६ एवढीच आहे. चार वर्षांपूर्वी ही संख्या १ लाख १० हजार एवढीच होती. अनधिकृत नळ कनेक्शन शोध मोहिमेनंतर उर्वरित ३८ हजार नळ कनेक्शन वाढले आहेत. त्यामुळेच पाणीपुरवठा विभागाने प्रत्येक वसाहतनिहाय आता सर्वेक्षणाला सुरू केले आहे. यात सर्वेक्षणामध्ये तुमच्याकडे मालमत्ता आहे का, नळ कनेक्शन घेतले आहे का, कनेक्शन अधिकृत आहे की अनधिकृत, अधिकृत असेल तर परवानगीचे प्रमाणपत्र दाखवा, अनधिकृत असेल तर अधिकृत करून घ्या, अशी सूचना केली जाणार आहे.
घरगुती नळ कनेक्शन- १४६७०२ व्यावसायिक नळ कनेक्शन-२२९८ इतर नळ कनेक्शन-०६ एकूण नळ कनेक्शन-१४९००६
टँकरद्वारे पाणीपुरवठा
एन-५ जलकुंभ
शिवाजीनगर, नवनाथनगर, भारतनगर, गारखेडा परिसराचा मागील भाग, विश्रांतीनगर, हिनानगर, चिकलठाणा, गणेशनगर
एन-७ जलकुंभ
हसूल, संपूर्ण जठवडा परिसर, मयूरपार्क, पिसादेवी परिसर
कोटला कॉलनी जलकुंभ
पडेगाव, निसर्ग कॉलनी, भावसिंगपुरा, पेठेनगर, न्यू पहाडसिंगपुरा, भगतसिंगपुरा, जगदीशनगर, हनुमान टेकडी काही भाग, पडेगाव, सैनिक कॉलनी, प्रिया कॉलनी, पोलिस कॉलनी.
नक्षत्रवाडी जलकुंभ
सातारा-देवळाई, संपूर्ण बीड बायपास परिसर, तेथून पुढे ए एस क्लबपर्यंतच्या संपूर्ण वसाहती, चाटे स्कूल परिसर.