Ramai Awas Yojana Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Mata Ramai Gharkul Yojana : घरावर फलक लावल्यानंतरच घरकुलचा अंतिम हप्ता

माता रमाई योजनेतील १०१ बोगस लाभार्थ्यांची चौकशींचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : माता रमाई घरकुल योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या घरावर योजनेचा फलक लावल्यानंतरच अंतिम १० टक्के अनुदानाचा हप्ता वितरित करावा, असे निर्देश सोमवारी (दि.३१) गलिच्छ वस्ती निर्मूलन, घर बांधणी व समाज कल्याण समितीचे सभापती जालिंदर शेंडगे यांनी दिले. यासह योजनेतील १०१ कथित बोगस लाभार्थ्यांची यादी सादर करून स्वतंत्र समितीमार्फत चौकशी करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.

माता रमाई घरकुल योजनेतील ऑनलाइन अर्जाची छाननी, स्थळपाहणी, अपात्र अर्जाची फेरतपासणी आणि अनुदान वितरणाचा सोमवारी महापालिका मुख्यालयात झालेल्या समितीच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. यावेळी ऑनलाइन अर्जाची प्राथमिक छाननी करून प्रत्यक्ष स्थळपाहणीसाठी सहा अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

स्थळपाहणीनंतर अर्ज पुढील कार्यवाहीसाठी समाजकल्याण विभागाकडे पाठविले जाणार आहेत. तसेच शासन निर्णयानुसार योजनेत ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. त्यानुसार २० टक्के बेसमेंटचे काम, ३० टक्के पुढील बांधकाम, ४० टक्के स्लॅब आणि उर्वरित १० टक्के रक्कम बांधकाम पूर्ण झाल्यानंतर देण्याची कार्यपद्धती बैठकीत स्पष्ट करण्यात आली. मात्र, अंतिम १० टक्के अनुदान देण्यापूर्वी लाभार्थ्याच्या घरावर योजनेचा फलक लावलेला असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

या बैठकीला समिती सदस्य अशोक दामले, काकासाहेब काकडे, मीना खरात, भाग्यश्री साळवे, अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे, उपायुक्त सविता सोनवणे यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT