Land Scam : ३० कोटींच्या जमीन घोटाळ्याचा 'मास्टरमाइंड' पनवेलमधून जेरबंद file photo
छत्रपती संभाजीनगर

Land Scam : ३० कोटींच्या जमीन घोटाळ्याचा 'मास्टरमाइंड' पनवेलमधून जेरबंद

निबंधक कार्यालयातून रजिस्टर ढापून केली फेरफार; १२ लाखांत वाजवला सौदा

पुढारी वृत्तसेवा

'Mastermind' behind ₹300 million land scam arrested in Panvel

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा सह दुय्यम निबंधक कार्यालयातील ४७ वर्षांपूर्वीच्या अभिलेखांत फेरफार करून ३० कोटींहून अधिक किमतीच्या जमिनी लाटण्याच्या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधाराला गुन्हे शाखेने पनवेल येथून बेड्या ठोकल्या आहेत. प्रशांत प्रकाश तांबे ( रा. पनवेल, नवी मुंबई) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, तो केवळ बारावी पास असतानाही वकील असल्याची बतावणी करून निबंधक कार्यालयातून चक्क मूळ रजिस्टर ढापून फेरफार केल्याचे तपासात उघड झाले आहे.

यापूर्वी अटक केलेल्या सागर आगळे, प्रतीक कोहळे, मोहन राठोड आणि नितीन राठोड यांच्या चौकशीतून तांबेचे नाव समोर आले होते. सर्व आरोपीना २७ नोव्हेंबर पर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली.

सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी नितीन राठोड आणि सागर आगळे यांनी अगोदर जमीन शोधली. त्यानंतर ती हडपण्यासाठी प्लॅन आखला. नितीनने वर्ध्याचा आरोपी प्रतीक कोहळे याचे पुण्यात कॅफे असल्याने तिथे त्याची भेट घेतली. त्याला या प्लॅनमध्ये सामील केले. प्रतीकने या कामासाठी तांबेला शोधून काढले.

पनवेल येथे एका बिल्डरकडे काम केल्यामुळे प्रशांत तांबे याला जमीन व रजिस्ट्रीच्या कागदपत्रांची चांगली माहिती होती. यातूनच त्याला आपण काहीही करू शकतो असा आत्मविश्वास आला होता. तिघांनी या संपूर्ण बनावटगिरीसाठी तांबेला तब्बल १२ लाख रुपये दिल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याने बनवेगिरी केल्यानंतर चार जणांना जमीन विक्रीपोटी १ कोटी ४५ लाखांपेक्षा अधिक रक्कम उकळली होती.

निबंधक कार्यालयात सागरची दादागिरी

या टोळीत कुख्यात आरोपी सागर आगळे हा जमीन विक्री करण्यासाठी ग्राहक आणून सौदा ठरविण्याचे काम करत होता. त्याने काही गुंड सोबत घेऊन सह दुय्यम निबंधक कार्यालयात दादागिरी केल्याचे तपासात समोर आले आहे. कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर दहशत निर्माण करून हे काम रेटून नेण्याचा प्रयत्न टोळीने केला होता का, या दिशेनेही तपास सुरू आहे. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर आणि सहायक निरीक्षक गंभीरराव पुढील तपास करत आहेत.

कार्यालयातील टोळीचा मदतगार रडारवर

या टोळीला दुय्यम निबंधक कार्यालयातील कोणी मदत केली याचा तपास पोलिस करत आहेत. जमिनीच्या या घोटाळ्यात हात ओले झालेले बाबू आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

हॉटेलमध्ये १५ दिवस मुक्काम अन् 'त्या' मशीनने केले बनावट शिक्के

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यादरम्यान तांबेने शहरातील समर्थनगर येथील एका हॉटेलमध्ये तब्बल १५ दिवस मुक्काम ठोकला होता. बारावी पास असूनही त्याने वकील असल्याची बतावणी केली आणि सह दुय्यम निबंधक कार्यालयात प्रॉपर्टी सर्च रिपोर्ट काढायचा असल्याचा अर्ज दिला. या बहाण्याने रेकॉर्ड रूममध्ये प्रवेश मिळवून कर्मचाऱ्यांची नजर चुकवत त्याने १९७९ चे मूळ रजिस्टरच बाहेर. बनावट शिक्के तयार करण्यासाठी त्याने चक्क नवीन मशीन विकत घेतले होते. त्याद्वारे दस्त क्रमांक ६०२७/१९७९ ते ६०३०/१९७९ या नोंदींमध्ये फेरफार करून पोखरी, दावरवाडी, गेवराई आणि मिटमिटा येथील कोट्यवधींच्या जमिनींची बोगस नोंद केली आणि रजिस्टर पुन्हा गुपचूप रेकॉर्ड रूममध्ये नेऊन ठेवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT