Gas Cylinder Explosion : बेकरीत गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट, अपार्टमेंटमध्येही आग file photo
छत्रपती संभाजीनगर

Gas Cylinder Explosion : बेकरीत गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट, अपार्टमेंटमध्येही आग

अग्निशमनच्या तत्परतेने अनर्थ टळला; उपमहापौरांची घटनास्थळी धाव

पुढारी वृत्तसेवा

Massive gas cylinder explosion at bakery; fire spreads to apartment building

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात रविवारी (दि. १९) अवघ्या काही तासांच्या अंतराने आगीच्या दोन घटना घडल्या. मध्यरात्री १:३० वाजेच्या सुमारास जानकी हॉटेल परिसरातील एका बेकरीला भीषण आग लागून गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली, तर सकाळी हेडगेवार रुग्णालयासमोरील अपार्टमेंटमध्येही आगीचा थरार पाहायला मिळाला. सुदैवाने अनिशमन दलाने वेळीच धाव घेत शर्थीचे प्रयत्न केल्याने या दोन्ही घटनांत मोठी दुर्घटना व जीवितहानी टळली आहे.

अपार्टमेंटमध्येही आगीचा थरार

दुसरी घटना रविवारी सकाळी ९.०७ वाजेच्या सुमारास घडली. हेडगेवार रुग्णालयासमोर असलेल्या 'सुनील व्हिला अपार्टमेंट'च्या पार्किंगमध्ये शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच सिडको अग्निशमन केंद्राच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. आग पहिल्या मजल्यापर्यंत पोहोचत असतानाच जवानांनी इमारतीतील रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढून आग आटोक्यात आणली.

वेळीच आग विझल्याने येथीलही मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांच्या मार्गदर्शनात विजय राठोड, विनायक कदम, चेतन तरोळे, वैभव बाकळे, जवान अशोक वेलदोडे, संदीप चव्हाण, सुरज राठोड, अमिर शेख, योगेश दुधे, अब्दुल वासे, विजय कोथमिरे, जगदीश गायकवाड, राजू ताटे, बाबासाहेब ताटे, विलास झरे, पांडुरंग मोठे, नंदकुमार घुगे, बाळासाहेब मुंगले, बाळासाहेब गव्हाड यांनी आगींवर नियंत्रण मिळविले.

बेकरीत सिलिंडरच्या स्फोटाने भिंतीही कोसळल्या

रविवारी मध्यरात्री १:३० वाजेच्या सुमारास जानकी हॉटेलजवळील 'कृष्णा बेकरी'ला अचानक भीषण आग लागली. आगीचा भडका उडाल्याने दुकानातील एका गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. या भीषण स्फोटाने बेकारीची पत्रे उडाली. भिंती फुटून विटा रस्त्यावर उडाल्या होत्या. आवाजामुळे मध्यरात्री नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. त्यातच आणखी एका सिलिंडरमधून गॅस गळती सुरू होती.

घटनेची माहिती मिळताच सिडको आणि पदमपुरा अग्निशमन केंद्राच्या गाड्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी पाण्याचा मारा सुरू केला. आतमध्ये गळती होत असलेला दुसरा सिलिंडर ड्यूटी अधिकारी चेतन तरोळे यांनी धाव घेत सुरक्षितपणे बाहेर काढला. यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. उपमहापौर राजेंद्र जंजाळ, पुंडलिकनगर ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र मुंढे यांनी धाव घेत मदतकार्यात सहभाग घेतला. सुमारे दोन तास अग्नितांडव सुरू होता. बेकरी पूर्णपणे जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT