Massive fire at silicon company, incident at Waluj
वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : वाळूज येथील सुप्रीम सिलिकॉन कंपनीला सोमवारी (दि. २७) दुपारी अचानक आग लागली. कंपनीत मोठ्या प्रमाणात सिलिकॉन व इतर रासायनिक रॉ मटेरियल असल्याने उशिरापर्यंत आगीची धगधग सुरू होती अभिजित सूर्यवंशी यांची वाळूज औद्योगिक क्षेत्रातील सुप्रीम सिलिकॉन (एच सेक्टर, प्लॉट क्र.५५) या नावाने कंपनी असून या कंपनीत सिलिकॉनचे उत्पादन घेण्यात येते. सोमवारी १२ ते १५ कामगार काम करत होते. दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास कंपनीत आग लागल्याचे कामगारांना दिसून आले.
वेळीच त्यांनी कंपनीतील फायर फायरिंगच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र कंपनीतील सिलिकॉन तसेच केमिकल रॉ मटेरियलने पेट घेतल्यामुळे क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केल्याचे पाहून कामगारांनी कंपनीतून बाहेर पळ काढला. काही वेळानंतर कंपनीत असलेले केमिकलचे फुटून स्फोट झाल्यासारखा आवाज झाल्याचे प्रत्यक्षदर्शीन सांगितले.
साडेतीन तासानंतर आगीवर नियंत्रण
आगीची माहिती मिळताच एमआयडीसीचे दोन बंब गरवारे एक तसेच खासगी टँकरच्या मदतीने आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. जवळपास तीन ते साडे तीन तासांच्या परिश्रमानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र तोपर्यंत कंपनीतील संपूर्ण मशीनरी व सिलिकॉन मटेरियल जळून भस्मसात झाले.