छत्रपती संभाजीनगर : मस्साजोग (जि. बीड) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि संघटित गुन्हेगारी टोळीचा सूत्रधार वाल्मीक कराड याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मोठा दणका दिला आहे. कराडचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावल्याने त्याच्या अटकेची प्रक्रिया कायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. न्या. एस. एम. घोडेस्वार यांनी बुधवारी (दि.17) यांनी हे आदेश दिले.
अधिक माहितीनुसार, संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडच्या जामीन अर्जावर सलग तीन दिवसांपासून खंडपीठात सुनावणी सुरू होती. वाल्मीक कराडच्या वकिलांनी दावा केला होता की, कराड याला अटक करताना लेखी कारणे देण्यात आली नव्हती. मात्र सरकारी वकील ॲड. अमरजितसिंह गिरासे यांनी पुराव्यांसह सिद्ध केले की, कराडला 31 डिसेंबर 2024 रोजी अटक झाली आणि त्याच दिवशी त्याला अटकेची कारणे देऊन त्याची स्वाक्षरी घेण्यात आली होती.
यावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांचीही स्वाक्षरी आहे, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. तसेच कराडवर 20 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असून, तो टोळीचा मास्टरमाइंड आहे. त्यावर कराडच्या वकिलांनी असा दावा केला होता की, इतर आरोपींशी कराडचा थेट संबंध नाही. मात्र सरकारी पक्षाने मांडले की, मोक्का कायद्यानुसार केवळ प्रत्यक्ष गुन्हा करणेच नाही, तर कट रचणे आणि आदेश देणे हेही कारवाईसाठी पुरेसे आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येसाठी कराड सतत इतर आरोपींच्या संपर्कात होता, याचे भक्कम पुरावे असल्याचे ॲड. गिरासे यांनी मंगळवारी सुनावणीवेळी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते.
न्यायालयात काय घडले ?
बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पुन्हा सुनावणी सुरू झाली. सुनावणीत कराडच्या वकिलांनी पुन्हा काही तांत्रिक आक्षेप नोंदवले आणि बीड येथील विशेष न्यायालयातील दोषनिश्चितीच्या प्रक्रियेला स्थगिती देण्याची विनंती केली. मात्र न्या. एस. एम. घोडेस्वार यांनी हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याचे मानून जामीन देण्यायोग्य नसल्याचे सांगितले.
न्यायालयाने आरोपीच्या वकिलांना विचारणा केली की, आपण दाखल केलेला जामीन अर्ज मागे घेता की आदेश पारित करायचे? त्यावर कराडच्या वकिलांनी आदेशाची विनंती केली असता न्यायालयाने वाल्मीक कराडचा जामीन अर्ज फेटाळून लावण्याचा निर्णय जाहीर केला. या प्रकरणात शासनाच्या वतीने ॲड. अमरजितसिंह गिरासे यांनी भक्कमपणे बाजू मंडळी. त्यांना ॲड. सचिन सलगरे यांनी सहकार्य केले. तसेच देशमुख यांच्या वतीने ॲड. नितीन गवारे आणि ॲड. धनंजय पाटील यांनी काम पाहिले.
संतोष देशमुख यांच्या घरच्यांना अश्रू अनावर
मुख्य आरोपी वाल्मीक कराडचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर बाहेर येताच दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नीला अश्रू अनावर झाले. त्यांनी डोळ्यातील पाणी पुसत सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांचे हात जोडून आभार मानले. सुनावणीवेळी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख व कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी निकाल ऐकण्यासाठी न्यायालयात मोठी गर्दी झाली होती.
कराडवर 19 डिसेंबरला दोषनिश्चिती
बीडच्या विशेष न्यायालयात या प्रकरणी 19 डिसेंबर रोजी दोषनिश्चितीची तारीख असून, आरोपी वाल्मीक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जावर 22 डिसेंबर रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.