घागरा घेण्याची इच्छा अपुरीच; लेकीचा शेवटचा फोन ठरला अखेरचा ! file photo
छत्रपती संभाजीनगर

घागरा घेण्याची इच्छा अपुरीच; लेकीचा शेवटचा फोन ठरला अखेरचा !

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने घेतला गळफास; पतीसह ७ जणांना बेड्या

पुढारी वृत्तसेवा

Married woman hangs herself after being harassed by her in-laws; 7 arrested, including husband.

छत्रपती संभाजीनगर : पुढारी वृत्तसेवा आई, १४ एप्रिलला बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त तू साडी घे आणि मला घागरा घ्यायचा आहे. आपण नवीन ड्रेस घेऊ... सकाळी आईशी उत्साहाने बोलणाऱ्या लेकीच्या आयुष्याचा दुपारी अचानक अंत होईल, याची पुसटशी कल्पनाही माहेरच्यांना नव्हती. सासरच्या अमानुष जाचाला बळी पडत ईश्वरी अजय बनकर या विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली. मात्र तिची आत्महत्या पैशासाठी नसून सासरच्यांनीच गळा दाबून हत्या केल्याचा आरोप करत माहेरच्या मंडळींनी बुधवारी (दि.८) घाटीत ठिय्या मांडला. याप्रकरणी छावणी पोलिसांनी पतीसह ७ आरोपींना तात्काळ अटक केल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक विवेक जाधव यांनी दिली.

मृत ईश्वरी बनकर त्रिशालाही मंगळवारी सकाळी ईश्वरीने आईला फोन करून जयंतीच्या खरेदीचे नियोजन केले होते. मात्र, दुपारी सासरच्यांनी अचानक फोन करून ईश्वरी फोन उचलत नाहीये असे सांगितले. घाबरलेल्या आईने आणि नातेवाईकांनी तात्काळ भावसिंगपुरा येथील श्रावस्ती कॉलनीत धाव घेतली. तिथे पोहोचल्यावर ईश्वरी पलंगावर निपचित अवस्थेत झोपवलेली आढळली.

ईश्वरी स्वतः गळफास घेऊच शकत नाही, तिला मारून पलंगावर झोपवण्यात आले आहे, असा टाहो फोडत माहेरच्यांनी हत्येचा आरोप केला. जोपर्यंत आरोपींना बेड्या ठोकल्या जात नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेत नातेवाईकांनी घाटी रुग्णालयात ठिय्या दिला. अखेर छावणी पोलिस ठाण्याचे प्रभारी एपीआय विवेक जाधव यांनी तात्काळ धाव घेत कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला.

लग्नात ५ तोळे सोने, २ लाख हुंडा

ईश्वरीचा विवाह २८ जून २०२० रोजी अजय बनकर याच्याशी झाला होता. लग्नात ५ तोळे सोने, २ लाख रुपये हुंडा आणि इतर मानपान करूनही सासरच्यांची भूक भागली नाही. पहिली तीन वर्षे चांगली गेल्यानंतर श्रावस्ती कॉलनी आणि पडेगाव येथील प्लॉटचे बांधकाम व हप्ते भरण्यासाठी माहेराहून पैसे आणण्याचा तगादा सुरू झाला. मार्च एंडिंग आलाय, घराचे हप्ते भरायला पैसे आण नाही तर घराला सील लागेल, असे म्हणत तिला वारंवार छळले जात होते.

जेवणात केस निघाल्याच्या कारणावरून बेदम मारहाण

घटनेपूर्वी ६ एप्रिलला रात्री जे-वणात केस निघाल्याच्या क्षुल्लक कारणावरून पती अजयने ईश्वरीला बेदम मारहाण केली आणि पैसे आणले नाही तर तिकडेच मरून जा, अशी धमकी दिली होती. सततच्या जाचाला कंटाळून ईश्वरीने मागील वर्षीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असे नातेवाइकांनी सांगितले.

१५ जणांवर गुन्हा; ७ जण कोठडीत

याप्रकरणी मुलीचे वडील राजू भुजंग (रा. तिसगाव, वळदगाव) यांच्या फिर्यादीवरून छावणी ठाण्यात १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात पती अजय बनकर, नणंद वैशाली मगरे, नंदोई विजय मगरे, दुसरी नणंद अश्विनी सदाफुले, महेश सदाफुले, चुलत सासरे चंद्रमणी बनकर, दिलीप बनकर व त्यांच्या पत्नी, तसेच चुलत दीर आशिष, गणेश व दिनेश यांचा समावेश आहे. हे सर्वजण पैशासाठी आणि चारित्र्यावर संशय घेऊन ईश्वरीचा छळ करत होते. पोलिसांनी पती अजयसह ७ जणांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

... अन् तीन वर्षांची त्रिशा पोरकी झाली !

उन्हाचा तडाखा जास्त असल्याने आपण त्रिशाला घरीच ठेवून खरेदीला जाऊ, असे ईश्वरीने तिच्या आईला शेवटच्या फोनवर सांगितले होते. चिमुकल्या त्रिशासाठी नवीन कपड्यांचे स्वप्नही तिने रंगवले होते. मात्र सासरच्यांच्या पैशाच्या हव्यासाने या तीन वर्षांच्या निष्पाप चिमुकलीच्या डोक्यावरून आईचे छत्र कायमचे हिरावून घेतले आहे. त्रिशाच्या पोरकेपणाने उपस्थितांचे डोळे पाणावले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT