Dowry Case : विवाह नोंदणीनंतर हुंड्यासाठी मोडले लग्न File Photo
छत्रपती संभाजीनगर

Dowry Case : विवाह नोंदणीनंतर हुंड्यासाठी मोडले लग्न

४ लाख रुपये खर्च, तरीही हुंड्याची हाव; पनवेलच्या नवरदेवासह तिघांवर मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Marriage broken for dowry after marriage registration

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : लग्नाची सर्व तयारी झाली, लाखो रुपये खर्च झाले, एवढेच नव्हे तर जिल्हाधिकारी कार्यालयात विवाह नोंदणीही पार पडली. मात्र त्यानंतर लगेचच नवरदेवाकडून एक लाख रुपये हुंड्याची मागणी करण्यात आली. वधूच्या कुटुंबीयांनी असमर्थता दर्शविल्याने ऐनवेळी लग्न मोडल्याचा प्रकार मुकुंदवाडी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी नवरदेवासह तिघांवर मुकुंदवाडी ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिंकू ललित जैन (नवरदेव), आरती ललित जैन (नवरदेवाची आई) आणि पारस ललित जैन (नवरदेवाचा भाऊ, सर्व रा. फ्लॅट नं. ३०२, गोकुळ कॉम्प्लेक्स, पनवेल, जि. रायगड, मुंबई) अशी आरोपींची नावे आहेत.

मुकुंदनगर परिसरातील एका ४५ वर्षीय फिर्यादी महिलेच्या तक्रारीनुसार, ती पती व मुलीसह मजुरी करून उदर्निवाह करते. त्यांचे कुटुंब मुकुंदनगर येथील चर्चमध्ये जात असल्याने तेथील फादरला मुलीच्या लग्नासाठी स्थळ पाहण्यास सांगितले होते. २० मे रोजी फादरने कॉलकरून पनवेलहून तेथील चर्चचे फादर व मुलाचे कुटुंब मुलगी पाहण्यास येणार असल्याचे कळविले. जैन कुटुंबाला मुलगी पसंत पडली.

त्यानंतर २१ जून रोजी फिर्यादी व त्यांचे नातेवाईक पनवेल येथे जाऊन घर पाहून आले होते व १५ ऑगस्ट २०२६ ही लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली होती. लग्नाच्या तयारीसाठी वधूकडील मंडळींनी मंगल कार्यालय, जेवण, डेकोरेशन, केटरिंग, फोटो, व्हिडिओ आणि बस्ता अशा विविध गोष्टींसाठी सुमारे ४ लाख रुपये खर्च केले होते.

६ ऑगस्ट रोजी नवरदेव रिंकू आणि त्याचे कुटुंबीय विवाह नोंदणीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते. सर्वांनी मिळून कलेक्टर ऑफिसमध्ये रीतसर विवाह नोंदणी पूर्ण केली. मात्र, त्यानंतर घरी आल्यावर जेवण करताना अचानक रिंकूची आई आणि भावाने १ लाख रुपये हुंड्याची मागणी केली. आधीच लग्नात मोठा खर्च झाल्याने फिर्यादीने हुंडा देण्यास नकार दिला. यामुळे संतापलेले नवरदेवाकडील मंडळी पनवेलला निघून गेले.

दुसऱ्या दिवशी, ७ ऑगस्ट रोजी सकाळीच नवरदेवाची आई आरती हिने फोन केला व तुम्ही हुंडा दिला नाही तसेच आमचा मानपानसुद्धा व्यवस्थित केला नाही. त्यामुळे आम्ही आमच्या मुलाचे लग्न तुमच्या मुलीसोबत लावणार नाहीं', असे सांगून लग्न मोडले. ऐनवेळी लस मोडल्याने व ४ लाख रुपयांचा खर्च वाया गेल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी महिलेने मुकुंदवाडी पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. पुढील तपास पोलिस निरीक्षक विवेक सोनवणे यांच्या मार्गदर्शनात जमादार ईश्वर पवार करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT