Marathwada water crisis pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Marathwada water crisis : मराठवाड्यात पाण्यासाठी धावपळ; टँकरशिवाय पर्याय नाहीच

उन्हाचा तडाखा वाढला : 63 गावे, 26 वाड्यांना टँकरचा आधार

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : यंदा मराठवाड्यात समाधानकारक पाऊस झाला असला तरी उन्हाळ्याच्या तीव झळामुळे पाणीटंचाईचे संकट पुन्हा गडद होऊ लागले आहे. वाढत्या तापमानामुळे पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटत चालले असून, अनेक गावांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. परिणामी प्रशासनाकडे टँकरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी बीड आणि धाराशिव वगळता इतर सर्वच जिल्ह्यांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि लातूर या जिल्ह्यांतील एकूण 63 गावे आणि 26 वाड्यांना सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यासाठी चार शासकीय तर तब्बल 102 खासगी टँकर कार्यरत आहेत.

गतवर्षी एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यातच मराठवाड्यातील अनेक भागांत टँकरची गरज भासू लागली होती. त्या तुलनेत यंदा टँकर उशिरा सुरू झाले असले तरी परिस्थिती हळूहळू गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे. 29 एप्रिल 2026 अखेर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 45 गावे आणि 12 वाड्यांना 73 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

जालना जिल्ह्यातील 16 गावे व 13 वाड्यांसाठी 29 टँकर, तर लातूर जिल्ह्यातील दोन गावे व एका वाडीसाठी दोन शासकीय टँकर कार्यरत आहेत. दरम्यान, संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने खासगी विहिरींचे अधिग््राहण करण्यास सुरुवात केली आहे.

मराठवाड्यात 154 विहिरींचे अधिग्रहण

मराठवाड्यात बीड व धाराशिव वगळता इतर जिल्ह्यांतील एकूण 154 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 61 विहिरींचा समावेश आहे. वाढत्या उन्हामुळे आगामी काळात पाणीटंचाई अधिक तीव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT