

प्रवीण शिंगटे
सातारा : सातारा जिल्ह्यात गतवर्षी पावसाने चांगली हजेरी लावली असली, तरी गेल्या महिन्यापासून कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. त्यामुळे भूजल पातळीत कमालीची घट जाणवू लागली आहे. ऐन उन्हाळ्यात सातारा जिल्ह्यातील 786 गावे व 1 हजार 39 वाड्या-वस्त्यांना टंचाईच्या झळा जाणवण्याची शक्यता आहे. सुमारे 22 कोटी 83 लाख 89 हजार रुपयांचा संभाव्य पाणी टंचाई आराखडा जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. या आराखड्यातून पाणी पुरवठ्याच्या अनुषंगाने विविध उपाययोजना राबविल्या जाणार आहेत. एप्रिल व मे या दोन महिन्यात टंचाई भासणाऱ्या गावातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागणार आहे.
जिल्ह्यात यावर्षी मुबलक प्रमाणात पाऊस झाला. मात्र, गेल्या महिन्यापासून कडक उन्हाचा चटका वाढू लागला आहे. कडक उन्हामुळे दिवसेंदिवस भूजल पातळीत घट होऊ लागली आहे. विहिरी, ओढे, नाले, नद्यांमधील पाणी पातळी कमालीची घटली आहे. जलस्रोत कोरडे पडायला सुरुवात झाली असल्याचे चित्र ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे. त्यामुळे पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्हा प्रशासनातर्फे दरवर्षी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा तयार करण्यात येतो. यंदाचा संभाव्य पाणी टंचाई आराखडा प्रशासनाने सादर केला आहे. ऑक्टोबर ते 30 जूनअखेर हा आराखडा तयार केला आहे. सातारा जिल्ह्यात उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. यासाठी 22 कोटी 83 लाख 89 हजार रुपये अंदाजित खर्चाचा पाणीटंचाई निवारण कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार सुमारे 786 गावे व 1 हजार 39 वाड्या वस्त्यामध्ये 962 विविध उपाययोजना राबवण्यात येणार आहेत.
प्रशासनाने हा आराखडा 30 जून 2026 पर्यंतच्या कालावधीसाठी तयार केला असून, त्यासाठी 22 कोटी 83 लाख 89 हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. जिल्ह्यातील 295 ठिकाणी नवीन विंधन विहीर घेण्यात येणार आहे. 53 ठिकाणी प्रस्तावित नळपाणी पुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती केली जाणार आहे. 155 ठिकाणी प्रस्तावित विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती केली जाणार आहे. 31 ठिकाणी जी आय पाईप वाढविण्यात येणार आहेत. 5ठिकाणी तात्पुरती नळ पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात येणार आहे. 127 टँकर व 380 बैलगाडीने पाणी पुरवठा केला जाणार आहे. 336 खाजगी विहिरी अधिग्रहीत केल्या जाणार आहेत. 89 ठिकाणच्या विहिरी खोल करुन त्यामधील गाळ काढला जाणार आहे.