मराठवाड्यात अडीचशे विहिरींचे अधिग्रहण pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Marathwada water crisis : मराठवाड्यात अडीचशे विहिरींचे अधिग्रहण

टंचाईची दाहकता वाढली; दीडशे टँकरद्वारे पाणीपुरवठा

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील पाणीटंचाईची तीव्रताही दिवसेंदिवस वाढत आहे. सद्यस्थितीत विभागात पाणीपुरवठ्यासाठी 268 खासगी विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या असून 156 टँकरद्वारे 92 गावे आणि 36 वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. सर्वाधिक 115 टँकर हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू आहेत.

मराठवाड्यात दरवर्षी फेब्रुवारीपासून पाणीटंचाई जाणवते. नियमित स्त्रोत आटलेल्या शेकडो गावांना प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. गतवर्षी विभागात दमदार पाऊस झाला. त्यामुळे यंदा पाणीटंचाई कमी जाणवेल असा अंदाज होता. त्याप्रमाणे यंदा फेब्रुवारी, मार्च महिन्यात टंचाईची तीव्रता जाणवली नाही. मात्र, एप्रिलपासून पाणीटंचाईने डोके वर काढल्याने तहानलेल्या गावांकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे.

परिणामी, जिल्हा प्रशासनाकडून गरजेनुसार टँकरला मंजुरी दिली जात आहे. सद्यस्थितीतही मराठवाड्यात 92 गावे आणि 36 वाड्यांना 156 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 115, जालना जिल्ह्यात 38, हिंगोली जिल्ह्यात 1 आणि लातूर जिल्ह्यात 2 टँकर सुरू आहेत.

यासोबतच विभागात गावांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी 268 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. मे महिन्यात टँकरच्या मागणीत वाढ झाली आहे. सर्वच जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाकडे टँकरचे प्रस्ताव दाखल होत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

जिल्हानिहाय अधिग्रहीत खासगी विहिरी

छत्रपती संभाजीनगर - 87

जालना - 33

परभणी - 4

हिंगोली - 24

नांदेड - 58

बीड - 37

लातूर - 25

धाराशिव - 00

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT