मराठवाडा धार्मिक पर्यटनाचे केंद्र, तीन ज्योतिर्लिंग, दोन शक्तिपीठ pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Marathwada religious tourism : मराठवाडा धार्मिक पर्यटनाचे केंद्र, तीन ज्योतिर्लिंग, दोन शक्तिपीठ

जैन, बौद्ध, शीख, मुस्लिम, ख्रिश्चन धर्मियांची स्थळे, जागतिक वारसा लाभलेल्या वास्तू

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर ः औंढा नागनाथ, परळी वैजनाथ आणि घृष्णेश्वर हे तीन ज्योतिर्लिंग, तसेच तुळजापूर, माहूर, अंबाजोगाई येथील देवीची शक्तिपीठे, नांदेड येथील तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा आणि जैन, बौद्ध, मुस्लिम धर्मियांच्या असलेल्या विविध स्थानांमुळे मराठवाडा प्रदेश हा धार्मिक पर्यटनाचे केंद्र बनला आहे. जागतिक वारसा लाभलेल्या अजिंठा-वेरूळ लेण्या बौद्ध आणि जैन विचारांची ओळख करून देतात.

वेरूळच्या कैलास लेण्या म्हणजे अखंड शिवमंदिर. या लेण्यांपासून जवळच असणारे घृष्णेश्वर मंदिर भाविकांना खुणावते. श्रावण, दिवाळी, उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात हा परिसर भाविकांनी गजबजून जातो. या मंदिराचा उल्लेख शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथांतही आहे. मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा सोळाव्या शतकात जीर्णोद्धार केल्याची नोंद असून, त्यानंतर अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला.

मंदिराचे बांधकाम लाल रंगांच्या दगडामध्ये करण्यात आले असून, सुबक नक्षीकाम आहे. वेरूळप्रमाणेच परळी वैजनाथ येथील वैजनाथ मंदिराचाही जीर्णोद्धार अहिल्याबाईंनी केला. हे मंदिर चिरेबंदी असून, मंदिराच्या लांब पायऱ्या व भव्य प्रवेशद्वार लक्ष वेधून घेतो. औंढा नागनाथ हे हिंगोली जिल्ह्यातील क्षेत्र असून, पांडवकाळात त्याची उभारणी झाल्याचे मानले जाते.

शिवालयाप्रमाणेच महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी माता, माहुरची रेणुकादेवी, अंबाजोगाईची जोगेश्वरी देवी ही देवीची तीन ठिकाणे मराठवाड्यात आहेत. त्यातील तुळजापूर, माहूर हे पूर्णपीठ असून, अंबाजोगाई हे कोकणातील अनेकांचे कुलदैवत आहे. शीखांचे दहावे आणि अंतिम गुरू गोविंदसिंग यांनी नांदेडला अंतिम श्वास घेतला. त्यामुळे नांदेडात असलेल्या गुरुद्वाराला शीख धर्मियांत मानाचे स्थान आहे.

हुजुरसाहीब गुरुद्वाराप्रमाणेच नांदेडला आणखी नऊ गुरुद्वारा आहेत. संत नामदेवांनी पंजाबात राहून भागवत धर्माचा प्रचार केला. शीखांच्या गुरूग्रंथ साहिबमध्ये संत नामदेवांच्या 67 अभंगांचा समावेश आहे. त्यामुळे नांदेडला येणारा शीख भाविक संत नामदेवांचे क्षेत्र असलेल्या हिंगोलीतील नरसी नामदेवाच्या मंदिरालाही जातो.

खुलताबाद, परभणीचा उरूस

संभाजीनगर, परभणी, खुलताबाद येथे असणाऱ्या मुस्लिम धर्मियांच्या दर्ग्यांनाही ऐतिहासिक परंपरा आहे. दौलताबाद येथे संत हजरत चांद बोथले यांच्या दर्ग्याचे दर्शन हिंदू-मुस्लिम भाविक घेतात. खुलताबाद, परभणीचा उरूस हा मराठवाड्यात प्रसिद्ध आहे. बीड, नांदेड, धाराशिव, जालना येथे इतिहासकालीन मशिदी, दर्गे आहेत. त्यातून सामाजिक एकोप्याचा संदेश दिला जातो.

संभाजीनगरातील ऐतिहासिक बुद्ध लेणी

संभाजीनगरात विद्यापीठाजवळ असणाऱ्या डोंगरात बुद्ध लेण्या पाहावयास मिळतात. अजिंठा-वेरूळ लेण्या बौद्ध लेण्या म्हणून परिचित आहेत. चौका येथे लोकुतरा महाविहार झाले असून, तेथे असणारी गौतम बुद्धांची मूर्ती लक्षवेधी आहे. उदगीर येथे नव्यानेच बांधलेल्या विश्वशांती बुद्धविहाराचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले होते.

कसे जावे?

  • संभाजीनगरातून वेरूळ, अजिंठा लेणी, घृष्णेश्वर मंदिर आणि इतर स्थळांपर्यंत जाण्यासाठी एसटीची सोय. तसेच एमटीडीसीच्या विशेष बसेसही उपलब्ध.

  • मराठवाड्यातील धार्मिक पर्यटनासाठीही संभाजीनगर मध्यवर्ती बसस्थानकातून एसटी बसेसची सोय आहे. खासगी वाहने देखील उपलब्ध आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT