Marathwada Graduate Constituency Election pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Marathwada Graduate Constituency Election : आघाडीत फिसकटले; युतीचे बंड शमले

मराठवाडा पदवीधर निवडणूक : उबाठाच्या उमेदवारीने रा.कॉं.श.प.ची डोकेदुखी वाढली

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशही महाविकास आघाडीत बिघाडी कायम राहिली आहे. तर दुसरीकडे महायुतीत भाजपला एम.के.देशमुख यांचे बंड शमविण्यात यश आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अ.प.) सतीश चव्हाण यांची डोकेदुखी काही प्रमाणात कमी झाली असली तरी महाविकास आघाडीत उबाठाच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस (श.प.) उमेदवाराच्या अडचणीत वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे.

मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक प्रचारापूर्वीच महाविकास आघाडीत उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चांगलाच पेच निर्माण झाला. महायुती आणि महाविकास आघाडीत दोन्हीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस असून हा राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदार संघ असल्याने महायुतीत जसे राष्ट्रवादीला मतदार संघ सुटला. तशीच मागणी महाविकास आघाडीतही राष्ट्रवादीने केली होती. परंतु, उबाठाने मराठवाडा पदवीधरसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडीतील या दोन्ही पक्षांत बेबनाव झाला. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी उबाठा उमेदवारी मागे घेईल, अशी आशा राष्ट्रवादी कॉंग्रेसला होती.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी तशी प्रतिक्रियादेखील व्यक्त केली होती. परंतु, ऐनवेळी उबाठाचे घुगे यांनी उमेदवारी मागे घेण्यास नकार दर्शविला ते संभाजीनगरमध्ये दुपारी ३ वाजेपर्यंत आले नाही. त्यामुळे अखेर आघाडीत बिघाडी कायम राहिली. आता महाविकास आघाडीतील दोन्ही घटक पक्षाचे उमेदवार एकमेकांविरोधात रिंगणात आहेत. तर दुसरीकडे महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपने बंडखोर देशमुख यांना उमेदवारी मागे घेण्याच्या सूचना केली.

त्यानुसार देशमुख यांनी माघार घेतली. त्यामुळे तुर्तास राष्ट्रवादीचे चव्हाण यांची डोकेदुखी काही प्रमाणात का होईना, कमी झाली आहे. परंतु, उबाठाच्या उमेदवारे राष्ट्रवादी कॉंग्रेस श.प.ची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे आता पदवीधर निवडणुकीत प्रत्यक्षात ४१ उमेदवार रिंगणात असले तरी दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि उबाठात थेट लढत होणार असेच चित्र दिसत आहे.

१३ उमेदवारांची माघार

मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी १३ उमेदवारांनी माघार घेतली. पहिल्या दिवशी एक आणि शेवटच्या दिवशी १२ असा उमेदवारी मागे घेण्याऱ्यांची आकडेवारी आहे. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात ४१ उमेदवार शिल्लक राहिले आहेत.

पुरवणी यादीत ३७ मतदार वाढले

मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी जानेवारीमध्ये अंतिम केलेल्या मतदार यादीत २ लाख ८८ हजार ७८३ मतदार होते. त्यानंतरही मतदार नोंदणी सुरूच होती. या पुरवणी मतदार यादीत नव्याने ३७ हजार मतदार वाढल्याने मतदार संख्या ३ लाख २६ हजार ७०१ वर पोहचली आहे. यात स्त्री मतदार ७७ हजार ७१७ आहेत. तर पुरुष मतदार २ लाख ३४८ हजार ९७१ आहेत. इतर मतदारांची संख्या १३ आहे.

आज उमेदवारांची बैठक

निवडणूक रिंगणात शिल्लक असलेल्या ४१ उमेदवारांची आज निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी.श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. या बैठकीत निवडणूक प्रक्रियेबाबत महत्त्वाच्या सूचना करण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्तांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

  • २९ सप्‍टेंबर ते ६ ऑक्‍टोबर दरम्‍यान ६२ उमेदवारांनी ९२ अर्ज दाखल केले होेते. ७ ऑक्‍टोबरला दाखल उमेदवारांच्‍या अर्जांची छाननी झाली. त्‍यात ८ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. यात काहींचे वय कमी असल्‍याने तर काहींचे शपथ पत्रात चुका आढळल्‍याने ते अवैध ठरविले.

  • मतमोजणी केंद्र : वुडस्ट्रीम डेकार एलएलपी, चिकलठाणा एमआयडीसी

  • निवडणुकीची तयारी पूर्ण : मतदार केंद्र : ८४२

  • केंद्राध्यक्ष : ९३५

  • मतदान अधिकारी : २८१४

  • मतमोजणी कर्मचारी : ४४५५

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT