छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा विभागाने राज्याला आतापर्यंत चार मुख्यमंत्री (Maharashtra CM) दिले. त्यापैकी शिवाजीराव पाटील निलंगेकर वगळता अन्य नेत्यांना प्रत्येकी दोन वेळा या पदावर काम करण्याची संधी मिळाली. ३ नेत्यांना दोन वेळा मुख्यमंत्रिपदी काम करण्याची संधी मिळाली. तर अंतर्गत कलह, न्यायालयाचा ताशेरे, गैरव्यवहाराच्या आरोपामुळे मुख्यमंत्रीपदाचा कालखंड एकही नेता पूर्ण करु शकला नाही.
वैदर्भिय नेते वसंतराव नाईक हे प्रदीर्घ काळ मुख्यमंत्रीपदावर (Maharashtra CM) राहिल्यानंतर मराठवाड्याचा मुख्यमंत्री व्हावा, ही मागणी जोर धरु लागली. तत्कालिन ज्येष्ठ नेते बाबूराव काळे, बाळासाहेब पवार या नेत्यांनी संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेत नाईकांना हटविण्याची मागणी केली. त्यातच १९७२ चे विकास आंदोलन पेटले. तेव्हा काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी शंकरराव चव्हाण यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची धुरा सोपविली. शंकरराव हे कडक स्वभावाचे त्यातच आणीबाणी असल्याने प्रशासनावर त्यांची पक्कड बसली. पण वसंतदादा पाटील यांच्याशी त्यांचे खटके उडू लागल्यामुळे शंकररावांनी त्यांना मंत्रिपदावरून हटविले. परिणामी संतप्त वसंतदादांनी राजकीय कौशल्य वापरून मुख्यमंत्री पद मिळविले.
वसंतदादा पाटील यांच्यानंतर मुख्यमंत्री (Maharashtra CM) झालेल्या शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात शंकरराव अर्थमंत्री झाले. मुख्यमंत्रीपदावर राहिलेल्या नेत्याने कॕबिनेट मंत्रीपद स्वीकारण्याचा हा तसा दुर्मिळ प्रसंग. परंतु, मंत्रिपदामुळे जनतेची सेवा करता येते, हा त्यांचा दृष्टिकोन.
शंकररावांचा पहिला कालखंड हा १९७५ ते १९७८ तर दुसरा १९८६ ते ८८ असा होता. इंदिरा गांधी, राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना केंद्रात घेण्यात आले. दरम्यानच्या काळात शरद पवार, बॕ. अंतुले, वसंतदादा, बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले. १९८५ ते १९८८ या काळात वसंतदादा विराजमान होते. परंतु, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रभाराव आणि त्यांच्यात विस्तवही जात नव्हता. तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांनी राव यांची बाजू उचलून धरल्याने वसंतदादा पायउतार झाले. त्यानंतर मराठवाड्यातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव पाटील निलंगेकरांची मुख्यमंत्री पदी नियुक्ती झाली. (३ जून २९८५ ते १२ मार्च १९८६ ). मुलीचे वैद्यकिय परीक्षेत गुण वाढविण्याचे प्रकरण त्यांच्या अंगलट आल्यानंतर निलंगेकरांना राजीनामा द्यावा, लागला व पुन्हा शंकरराव मुख्यमंत्री झाले. (Maharashtra CM)
१८ ऑक्टोबर १९९९ ते १८ जानेवारी २००३ हा विलासराव देशमुख यांचा पहिला कालखंड. ९५ ला विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विलासरावांनी झंझावाती दौरे काढून ९९ च्या निवडणुकीनंतर थेट सीएम पर्यंत मजल मारली. कालांतराने सक्रिय झालेल्या राजकीय विरोधकांनी त्यांचा बळी घेतला. विलासरावानंतर सुशिलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकांत काँग्रेसने बाजी मारली. पण सर्वच आमदारांशी असणारा संपर्क त्यांच्या कामी आला. व एक नोव्हेंबर २००४ ला ते दुस-यांदा मुख्यमंत्री झाले. २००८ मध्ये मुंबईत झालेला दहशतवादी हल्ला व रामगोपाल वर्मा, रितेशला सोबत घेत हॉटेल ताजला भेट दिल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर पक्षाने त्यांना हटविले. पुढे विलासराव केंद्रात गेले.
विलासरावानंतर अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ८ डिसेंबर २००८ ते २००९ आणि ७ नोव्हेंबर २००९ ते ११ नोव्हेंबर २०१० हा त्यांचा कालखंड. २००९ ची विधानसभा निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली झाली. पण आदर्श घोटाळा उजेडात आल्यानंतर चव्हाण यांना पद सोडावे लागले.
- महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी राहण्याची संधी शंकरराव आणि अशोकराव चव्हाण या पिता पुत्रांना मिळाली.
- शंकरराव, अशोकराव आणि विलासराव काँग्रेसचे असले तरी त्यांनी पक्षात कधी ना कधी बंडखोरी केली.
- निलंगेकरानंतर शंकरराव तर विलासरावानंतर अशोक चव्हाण. मराठवाड्यातील नेत्याने मराठवाड्याकडे सूत्रे सोपविली.
- न्यायालयाच्या ठपक्यामुळे निलंगेकर पायउतार झाले. त्यानंतर सुशिलकुमार शिंदे मुख्यमंत्री होईपर्यंत ते राजकीय विजनवासात होते. शिंदे यांच्या काळात ते महसूलमंत्री झाले.
- आठ जिल्हे असलेल्या मराठवाड्यात नांदेड आणि लातूरला मुख्यमंत्रीपद मिळाले. सुंदरराव सोळंके व गोपीनाथराव हे बीड चे. हे दोघेही उपमुख्यमंत्री होते. हा एक योगायोग.