Death Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Farmer Deaths Marathwada : मराठवाड्यात आणखी पाच शेतकऱ्यांनी जीवन संपवले

दुष्काळाचा फटका : हिंगोलीत दोन, संभाजीनगरात दोन तर बीडमध्ये एकाची आत्महत्या

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : दुष्काळामुळे उद्भवलेली नापिकीची स्थिती, कर्जबाजारीपणा यामुळे शेतकरी हतबल झाला असून पुन्हा एकदा मराठवाड्यात शेतकरी आत्महत्याचे सत्र सुरू झाले आहे. शनिवारी मराठवाड्यातील हिंगोली व संभाजीनगरात प्रत्येकी दोन तर बीड जिल्ह्यात एक अशा पाच शेतकऱ्यांनी जीवन संपवल्याचे समोर आले.

वसमत तालुक्यात दोन शेतकरी कर्जबाजारीपणाचे बळी

कुरुंदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत शेतकरी आत्महत्येच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. कुरुंदा येथील तरुण शेतकरी गितेश सोम्मर (वय २६) यांच्याकडे पाच एकर शेती असून त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. पावसाने खंड दिल्याने सोयाबीन व अन्य पिके वाळून गेल्याने उत्पादन हाती येणार नाही या चिंतेतून त्यांनी शेतातील आखाड्यावर विषारी औषध प्राशन केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील व पत्नी असा परिवार आहे.

दुसऱ्या घटनेत, महमदपूरवाडी येथील संतोष जटाळे (वय ४३) यांनी तीन एकर शेती असूनही नापिकी आणि बँकेचे १ लाख ३० हजार रुपयांचे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेतून ८ सप्टेंबर रोजी विषारी औषध प्राशन केले. रुग्णालयात उपचारादरम्यान ३० सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि तीन मुली असा परिवार आहे. या दोन्ही प्रकरणांत कुरुंदा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

बुलढाण्यात सुसाईड नोट लिहून शेतकऱ्याची आत्महत्या

संग्रामपूर तालुक्यातील चोंडी टाकळेश्वर येथील अल्पभूधारक शेतकरी शंकर रामभाऊ भारसाकळे (४९) यांनी कर्जाचा बोजा आणि दुष्काळाच्या नैराश्यातून शनिवारी पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. "शेती, घर आणि पत्नीचे दागिने गहाण ठेवूनही कर्ज फिटले नाही," अशी भावुक सुसाईड नोट त्यांनी लिहून ठेवली आहे.

विशेष म्हणजे, राज्याचे महसूल व दुष्काळ निवारण मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आज बुलढाणा जिल्ह्याच्या दुष्काळ आढावा दौऱ्यावर असतानाच ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

बीडमध्येही दुष्काळाचा आणखी एक बळी

दुसरीकडे, बीड तालुक्यातही दुष्काळाच्या संकटास कंटाळून पिंपरनई येथील ४४ वर्षीय शेतकरी विक्रम बाबासाहेब दाभाडे यांनी दुष्काळ आणि मुलीच्या लसाच्या विवंचनेतून शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. नेहमीच्या वेळेत घरी न परतल्याने मुलीने शोध घेतला असता हा प्रकार उघडकीस आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. ऐन खरीप हंगामात हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेल्याने हतबल झालेला बळीराजा संकटात सापडला आहे.

संभाजीनगरात दोन आत्महत्या

पावसाने ओढ दिल्याने हातचे पीक वाया गेले, तर दुसरीकडे कर्जाचा डोंगर वाढत गेल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या छत्रपती संभाजीनगरातील फुलंब्री आणि सिल्लोड तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी विषारी द्रव प्राशन केले. छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना दोघांचाही मृत्यू झाला. विष्णू विठ्ठल गाडेकर (४४, गिरसावळी, ता. फुलंब्री) आणि सागर रंगनाथ दौंड (२९, पानवडोद, ता. सिल्लोड) अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत.

विष्णू गाडेकर यांनी सुमारे १५ दिवस, तर सागर दौंड यांनी चार दिवस मृत्यूशी झुंज दिली. विष्णू यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. तिन्ही मुले शिक्षण घेत आहेत. हलाखीच्या परिस्थितीत ते स्वतःची दीड एकर कोरडवाहू शेती करून तसेच इतर ठिकाणी मजुरी करत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. यंदा पिकातून चांगले उत्पन्न मिळेल आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारेल, अशी त्यांना अपेक्षा होती. पेरणीसाठी त्यांनी सोसायटीचे कर्ज, सावकारी कर्ज तसेच बी-बियाण्यांची उधारी केली होती. मात्र, सुमारे दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने हातातोंडाशी आलेले पीक करपून गेले. त्यामुळे ते आर्थिक विवंचनेत होते.

शेतकरी सागर रंगनाथ दौंड यांनी २७ सप्टेंबर रोजी रात्री आठ ते नऊच्या सुमारास स्वतःच्या शेतातील वाळून गेलेल्या मका पिकात कीटकनाशक प्राशन केले. त्यानंतर त्यांनी आईला फोन करून आपण कर्जबाजारी झाल्याचे सांगितले. कुटुंबीयांनी त्यांना गंभीर अवस्थेत प्रथम सिल्लोड येथील रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. घाटी रुग्णालयात चार दिवस उपचार सुरू होते. मात्र, गुरुवारी १ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT