Sandipan Bhumre File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sandipan Bhumre: संपूर्ण मराठवाडा दुष्काळग्रस्त घोषित करा; खासदार संदिपान भूमरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

संपूर्ण मराठवाडा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक सहाय्य द्यावे, अशी आग्रही मागणी खासदार संदिपान भूमरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Sandipan Bhumre

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात यंदा अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने अनेक भागांत गंभीर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसातील मोठे खंड, अपुरा पाऊस आणि जमिनीतील कमी होत चाललेला ओलावा यामुळे खरीप पिकांवर मोठा परिणाम झाला असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण मराठवाडा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक सहाय्य द्यावे, अशी आग्रही मागणी खासदार संदिपान भूमरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

खासदार भूमरे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, पावसाच्या लहरीपणामुळे अनेक भागांतील पिकांची वाढ खुंटली असून पिके करपण्याच्या स्थितीत आहेत. शेतकऱ्यांनी पेरणी, बियाणे, खते, औषधे आणि मशागतीसाठी मोठा खर्च केला आहे. मात्र, पावसाअभावी हा संपूर्ण खर्च वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ही केवळ पिकांची हानी नसून हजारो शेतकरी कुटुंबांच्या उपजीविकेचा गंभीर प्रश्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील सर्व तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण, पेरणीची स्थिती, पिकांची वाढ, उपलब्ध पाणीसाठा, जमिनीतील ओलावा आणि संभाव्य पीक नुकसानीचा शास्त्रीय व तातडीने आढावा घेऊन दुष्काळ जाहीर करण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी भूमरे यांनी केली आहे.

शेतकऱ्यांसाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी

१. दुष्काळसदृश परिस्थितीची तातडीने पाहणी करून संपूर्ण मराठवाडा दुष्काळग्रस्त घोषित करावा.

२. पिकांचे तातडीने पंचनामे करून प्रत्यक्ष नुकसानीच्या आधारे आर्थिक मदत द्यावी.

३. शेतकऱ्यांसाठी विशेष आर्थिक मदत पॅकेज जाहीर करावे.

४. पीक विम्याची नुकसानभरपाई तातडीने मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी.

५. पीक कर्जाची वसुली स्थगित करून कर्जाचे पुनर्गठन अथवा पुनर्निर्धारण करावे.

६. दुष्काळग्रस्त भागातील वीजबिल, पाणीपट्टी व संबंधित देयकांमध्ये आवश्यक सवलती द्याव्यात.

७. जनावरांसाठी चारा छावण्या, चारा, आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.

८. पुढील हंगामासाठी मोफत अथवा अनुदानित बियाणे, खते व कृषी निविष्ठा उपलब्ध करून द्याव्यात.

९. दुष्काळग्रस्त कुटुंबांना शासनाच्या सर्व योजनांचा तातडीने लाभ मिळावा यासाठी विशेष प्रशासनिक मोहीम राबवावी.

"मराठवाड्यातील शेतकरी आज मोठ्या संकटात आहे. शासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून संवेदनशीलतेने आणि युद्धपातळीवर निर्णय घेण्याची गरज आहे. शेतकऱ्याला केवळ आश्वासनच नव्हे, तर प्रत्यक्ष आणि तातडीची आर्थिक मदत मिळणे आवश्यक आहे," असे खासदार संदिपान भूमरे यांनी पत्रातून स्पष्ट केले.

त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याचा तातडीने आढावा घेऊन दुष्काळ जाहीर करावा आणि संकटग्रस्त शेतकरी बांधवांसाठी विशेष आर्थिक मदत पॅकेज मंजूर करावे, अशी आग्रही मागणी खासदार भूमरे यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT