छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यातील पूरस्थितीने रविवारी आणखी विदारक स्वरूप धारण केले. रविवारी सकाळपर्यंत विभागात आणखी १९८ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. दुसरीकडे जायकवाडी, माजलगाव, मांजरा, शिवना टाकळी आदी धरणांमधून नदीपात्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नदीकाठच्या हजारो गावांमध्ये हाहाकार उडाला आहे.
कमी पावसाचा प्रदेश असलेल्या मराठवाड्यात यंदा जूनपासून पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. त्यात सप्टेंबर महिन्यात दररोज शेकडो महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी होत असल्याने पूरपरिस्थिती कायम आहे. तर पावसामुळे खरिपाची पिके उद्धस्त झाली आहेत. शनिवारी रात्री ते रविवारी सकाळपर्यंत विभागात सरासरी ५५. ६ मिमी पाऊस कोसळला. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक ११०. ३ मिमी पाऊस झाला.
अतिवृष्टीमुळे विभागात नद्यांची पाणीपातळी आणखी वाढली. त्यामुळे सकाळपासूनच प्रशासनाला ठिकठिकाणी बचावकार्य करावे लागत आहे. आधीच भरलेल्या धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू असल्याने धरणांमधून नदीपात्रातील विसर्ग वाढविण्यात आला आहे.
मांजरा, माजलगाव, शिवना टाकळी सह विविध धरणांमधून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे परिस्थिती आणखीनच बिघडली आहे. गेल्या चोवीस तासात जालना जिल्ह्यात ६२. ९ मिमी, बीड जिल्ह्यात ६३. ८ मिमी, लातूर जिल्ह्यात २५. ४ मिमी, धाराशिव जिल्ह्यात ३९ मिमी, नांदेड जिल्ह्यात २६. २ मिमी, परभणी जिल्ह्यात ४४. ५, हिंगोली जिल्ह्यात ५५. ५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जायकवाडी धरणातून गोदावरी नदीत ३ लाख ६ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. हा विसर्ग स्थिर ठेवण्याचा प्रयत्न आहे. परंतु रात्रीतून जास्त पाऊस झाल्यास विसर्ग वाढवावा लागेल. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.- समाधान सब्बीनवार, अधिक्षक अभियंता,