Marathwada Water Storage pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Marathwada Water Storage : मराठवाड्यात धरणांत ६६ टक्के पाणी; १४४ दिवस पुरेल एवढचा चारा

मराठवाड्यात यंदा ३१ टक्के पावसाची तूट

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात तब्बल ३१ टक्के पावसाची तूट झाल्याने दुष्काळाचे ढग अधिकच गडद झाले आहेत. त्यामुळे खरीप पिकांची स्थिती चिंताजनक आहे. तर ७८० पैकी ५९६ लघु आणि ७६ पैकी ५४ मध्यम अशा एकूण ६५० प्रकल्पांमध्ये केवळ २५ टक्क्यांच्या आतच जलसाठा उपलब्ध असल्याने पिण्याच्या पाण्याची बिकट स्थिती निर्माण झाली आहे.

ऐन पावसाळ्यात ९४ गावांना १७१ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असून जनावरांना १४४ दिवस पुरेल एवढाच चारा उपलब्ध आहे, असा अहवाल मंगळवारी (दि. १५) विभागीय आयुक्तालयाच्या वतीने राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे.

मराठवाड्यात यंदाच्या मान्सूनमध्ये जून ते सप्टेंबर २०२६ या खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात पावसाचे खंड पडल्याने मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. १४ सप्टेंबरअखेर विभागात अपेक्षित ५९१ मि.मी. पावसाच्या तुलनेत ४०५.६० मि.मी. पाऊस झाला असून, अपेक्षित पर्जन्यमानाच्या तुलनेत ६८.६३ टक्के पाऊस झाला आहे. म्हणजेच विभागात सुमारे 31.37 टक्के पावसाची तूट आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ८३.२१, जालन्यात ८०.९९, नांदेडमध्ये ७७.२७, हिंगोलीत ७०.५९, बीडमध्ये ६४.६९, धाराशिवमध्ये ६१, परभणीत ५५.४५, तर लातूरमध्ये सर्वात कमी ५२.२२ टक्के पाऊस झाला आहे.

पिकांवरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. सोयाबीनमध्ये शेंगा लागणे व भरण्यावर परिणाम होऊन उत्पादन घटण्याची शक्यता आहे. कापूस पाते व फुले अवस्थेत असून पातेगळ, फुलेगळ आणि किडींचा प्रादुर्भाव दिसत आहे. तुरीमध्ये वाढ खुंटणे व उत्पादन घटण्याची शक्यता असून मूग-उडीद पिकांनाही पावसाअभावी फटका बसला आहे. जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली व नांदेडमध्ये पावसाच्या खंडाचा परिणाम गंभीर आहे.

६५० प्रकल्पांमध्ये २५ टक्केच जलसाठा

मराठवाड्यातील ७८० लघु प्रकल्पांपैकी ५९६ प्रकल्पांमध्ये केवळ ० ते २५ टक्केच जलसाठा आहे. तर एकूण ७६ मध्यम प्रकल्पांपैकी तब्बल ५४ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणी आहे. तर मोठ्या ११ प्रकल्पांपैकी ६ धरण ४० टक्क्यांच्या आत तर उर्वरीत ५ पैकी २ प्रकल्प ८० टक्क्यांपेक्षा अधिक आणि ३ प्रकल्प ७० टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा आहे. एकूण १८२ टीएससी उपयुक्त पाणीसाठ्यापैकी १२०.६१ टीएमसी म्हणजेच ६६.२५ टक्के अशी चिंताजनक स्थिती आहे.

विभागातील ५०६ पैकी १५१ मंडळांमध्ये २१ दिवसांपासून पावसाचा खंड आहे. तर ६६ मंडळांमध्ये २८ दिवसांपासून पाऊसच नाही.

१७१ टँकरने पाणीपुरवठा

विभागातील ९४ गावे आणि ४७ वाड्यांना १७१ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यात ३ शासकीय व १६८ खासगी टँकर आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी ७० टँकर सुरू आहेत.

१४४ दिवसांचाच चारा उपलब्धता

विभागात सद्यस्थितीत चारा/वेरणाची सरासरी उपलब्धता १४४ दिवसांची आहे. मात्र जालना येथे ८९, बीड १००, परभणी ११४, लातूर १५०, नांदेड १६३, हिंगोली १५२, छत्रपती संभाजीनगर १८८आणि धाराशिवमध्ये १९८ दिवसांची उपलब्धता आहे.

धरणांची टक्केवारी

जायकवाडी -८६.६९

विष्णुपुरी -९१.३५

येलदरी -६२.२८

निम्न तेरणा -२३.४४

सिद्धेश्वर- ३४.३५

माजलगाव- २७.५६

मांजरा- ११.३८

सिना कोळेगाव -०

माजलगाव- २७.५६

मानार- ६०.७३

निम्न दुधना- २१.३२

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT