जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनात माजी जि.प. अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब शिंदे यांची भेट घेताना खासदार संदीपान भुमरे. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Marathwada water issue : मराठवाड्याचे वैधानिक विकास मंडळ कार्यान्वित करा

संघर्ष समितीचे धरणे आंदोलन सुरूच; खा. भुमरे, आ. बोरनारे, जलील यांचा पाठिंबा

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील सिंचन अनुशेष कायमचा दूर करण्यासाठी नदीजोड प्रकल्पाद्वारे २४० टीएमसी पाणी देण्याची कारवाई तातडीने करावे. त्यासोबतच मराठवाडा वैधानिक विकास मंडळ त्वरीत कार्यान्वित करावे, या मागणीसाठी मंगळवारपासून मराठवाडा समन्यायी पाणी वाटप संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. त्यास बुधवारी (दि. १७) शिवसेना खासदार संदीपान भुमरे, आमदार रमेश बोरनारे, एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी भेट देत पाठिंबा दिला.

मराठवाडा समन्यायी पाणी वाटप संघर्ष समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. यात मराठवाड्यातील सिंचनाचा अनुशेष तब्बल ६. १७ लाख हेक्टर असून, सुमारे ७० टक्के क्षेत्र अवर्षणप्रवण आहे. सिंचन आयोगाच्या मापदंडानुसार प्रदेशात २६० टीएमसी पाण्याची तूट आहे.

अपुऱ्या सिंचनामुळे कोरडवाहू शेती आणि शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती गंभीर झाली असून, पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न अनेक भागांत कायम आहे. पार-गोदावरी नदीजोड योजनेच्या पुनर्नियोजन प्रस्तावाला तातडीने मंजुरी द्यावी, तसेच वैजापूर, कन्नड, गंगापूरसह दुष्काळग्रस्त भागांना कालवा अथवा लिफ्टद्वारे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

२०१९ मध्ये पश्चिमवाहिनी नद्यांचे १५५ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यास मान्यता देण्यात आली; मात्र अद्याप प्रत्यक्ष कार्यवाही झालेली नाही तसेच उल्हास-वैतरणा खोऱ्यातील ८० टीएमसी पाणी वळविण्याच्या योजनेला प्रशासकीय मान्यता देऊन पुढील कार्यवाही करावी, त्यासोबतच मराठवाड्याचे वैधानिक विकास मंडळ कार्यान्वीत करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

अनुशेषाची एकूण किंमत ५० हजार कोटींपर्यंत गेली असून ती दूर करण्यासाठी शासनाने दरवर्षी १० हजार कोटी रुपये द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १५ सप्टेंबरपासून हे धरणे आंदोलन सुरू आहे.

खा. भुमरे, आ. बोरनारे, जलील यांचा पाठिंबा

मराठवाड्याच्या समन्यायी पाण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या या धरणे आंदोलनाला बुधवारी खासदार संदीपान भुमरे यांनी भेट देत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. त्यासोबतच शासनाकडे सतत यासाठी पाठपुरावा करेल, असे आश्वासन दिले. त्यासोबतच आमदार रमेश बोरनारे, एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्ह्याचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आंदोलनाला भेट देत पाणी मिळालेच पाहिजे, अशी भूमिका मांडत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT