Sambhajinagar illegal plotting : महापालिकेने फिरवला अनधिकृत प्लॉटिंगवर बुलडोझर

नारेगाव, पहाडसिंगपुरा, भावसिंगपुऱ्यातील ६०९ प्लॉट जमीनदोस्त : चार विकासकांवर गुन्हा दाखल
Sambhajinagar illegal plotting
नारेगावातील अनधिकृत प्लॉटिंगसह ले आऊटमधील अंतर्गत सिमेंट रस्तेही जेसीबीच्या सहाय्याने फोडताना महापालिकेचे पथक.pudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या हद्दीत बेकायदा प्लॉटिंग करून जमिनीचे तुकडे विक्रीसाठी सज्ज करणाऱ्या विकासकांवर महापालिकेने बुधवारी (दि.१६) मोठी कारवाई केली. नारेगाव, पहाडसिंगपुरा आणि भावसिंगपुरा परिसरातील तब्बल ६०९ प्लॉटवर जेसीबी फिरवून ले-आऊट उद्ध्वस्त करण्यात आले. यासह प्लॉटधारकांसाठी तयार केलेले विनापरवाना सिमेंटचे रस्तेही खोदून काढण्यात आले. या प्रकरणी चार विकासकांविरुद्ध हर्सल पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

महापालिकेने गुंठेवारी नियमितीकरण मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. यात भूखंडाच्या गुंठेवारीसाठी ५० टक्के सवलत जाहीर केली असून ही सवलत देताना मनपा हद्दीत अनधिकृत प्लॉटिंग रोखण्यासाठी धडक कारवाई करण्याचे आदेश मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी दिले आहेत. त्यानुसार अतिक्रमण विभागाचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण विभागाच्या पथकाकडून कारवाई हाती घेण्यात आली आहे.

Sambhajinagar illegal plotting
Sambhajinagar dangerous school building : विद्यार्थ्यांच्या वाटेवर जीर्ण इमारतीचा धोका; ग्रामस्थांचे उपोषण

यात मनपा पथकाने बुधवारी नारेगावातील गट क्रमांक २० व २१ मध्ये सकाळी ११ वाजता कारवाईला सुरुवात केली. तसेच अतिक्रमण विभागाचे सनियंत्रण अधिकारी वाहुळे यांच्या पथकाने केलेल्या पाहणीत शौकत हादी आणि अनिल डायगव्हाणे पाटील यांनी कोणतीही परवानगी न घेता प्लॉटिंग केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर २७० प्लॉट जमीनदोस्त करण्यात आले. या ठिकाणी उभारण्यात आलेले सिमेंटचे अंतर्गत रस्तेही जेसीबीच्या साहाय्याने फोडण्यात आले.

यानंतर पथकाने पहाडसिंगपुरा येथील हनुमान टेकडीजवळील गट क्रमांक ३७ गाठले. येथील चार एकर क्षेत्रात शीतल डहाळे यांनी विकसित केलेले १८० प्लॉट निष्कासित करण्यात आले. तसेच भावसिंगपुरा येथील गट क्रमांक २१/१ व २२ मधील साडेतीन एकर जागेवर दादाराव लोखंडे यांनी तयार केलेले १५९ प्लॉटही कारवाईत उद्ध्वस्त करण्यात आले.

दरम्यान, देवळाई, पडेगाव, मिटमिटा आणि हर्मूलनंतर आता महापालिकेने अनधिकृत प्लॉटिंगच्या कारवाईचा विस्तार या भागात केला आहे. आतापर्यंत शहरातील शेकडो एकर क्षेत्रावरील चार हजारांहून अधिक अनधिकृत प्लॉटिंगवर कारवाई करण्यात आली आहे. शीतल डहाळे, दादाराव लोखंडे, शौकत हादी आणि अनिल डायगव्हाणे पाटील यांच्याविरोधात हसूल पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई अतिक्रमण विभागाचे सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त संजय सुरडकर, इमारत निरीक्षक मुकेश खडसे, रवींद्र देसाई तसेच नागरी मित्र पथकाने केली.

Sambhajinagar illegal plotting
UBT Marathwada Development Protest: उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आजसंभाजीनगरात शिवसेनेचा 'एल्गार'

आता ड्रोनचा वापर

शहरात नव्याने आकाराला येणाऱ्या अनधिकृत ले-आऊटवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका ड्रोनचा वापर करणार आहे. ड्रोनच्या माध्यमातून बेकायदा प्लॉटिंगचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती आयुक्त अमोल येडगे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news