विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेले ज्येष्ठ आरक्षण अभ्यासक राजेंद्र दाते पाटील व उपस्थित पदाधिकारी. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Maratha reservation protest : शाश्वत मराठा आरक्षणासाठी दाते पाटील यांचे आमरण उपोषण सुरूच

विविध क्षेत्रांतील मान्यवर, संघटनांचा पाठिंबा

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शाश्वत आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. पोलिसांची परवानगी नसतानाही रविवारी (दि.९) क्रांती चौकात उपोषण आंदोलन केल्यानंतर मोर्चाचे ज्येष्ठ आरक्षण अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी विभागीय आयुक्तालयासमोर आमरण उपोषण सुरू केले.

सोमवारी त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस होता. दिवसभर विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी उपोषणस्थळी भेट देत उपोषणाला पाठिंबा दर्शविला. आरक्षण मिळेपर्यंत उपोषणातून माघार घेणार नसल्याचा निर्धार यावेळी दाते पाटील यांनी व्यक्त केला.

मराठा समाजाला कायदेशीर, घटनात्मक आणि न्यायालयीन कसोटीवर टिकणारे शाश्वत आरक्षण मिळावे, यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आल्याचे दाते पाटील यांनी सांगितले. हैदराबाद गॅझेटिअरच्या आधारे मराठा-कुणबी नोंद अथवा वंशावळ नसलेल्या मराठा बांधवांना कुणबी जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र देण्याबाबत शासनाने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली.

तसेच एसईबीसी प्रवर्गाला ओबीसीप्रमाणे शिक्षण, नोकरी, शिष्यवृत्ती, शुल्क सवलत आणि शासकीय योजनांचा लाभ द्यावा, आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, सारथी संस्थेला पाच हजार कोटी, तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला दहा हजार कोटींचा निधी द्यावा, प्रलंबित उमेदवारांना तातडीने नियुक्त्या द्याव्यात आणि कायगाव येथे मराठा हुतात्मा स्मारक उभारावे, या मागण्याही करण्यात आल्या.

दरम्यान, याप्रसंगी प्रा. माणिकराव शिंदे, डॉ. शिवानंद भानुसे, योगेश शेळके धामोरीकर, सुनील कोटकर यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी दिवसभर उपस्थित होते. त्यांनी शाश्वत आरक्षणाच्या लढ्यात आपण कायम सोबत असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण; जरांगेंना विरोध नाही

सर्व मागण्या मान्य होईपर्यंत दाते पाटील उपोषण सोडणार नसून, त्यांना आमचा पाठिंबा राहील, असे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी स्पष्ट केले. तसेच मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना कोणताही विरोध नसल्याचेही आंदोलकांनी स्पष्ट केले. आपला लढा कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून, शाश्वत आरक्षणासाठी सरकारविरोधात असल्याचे मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT