Purna Soybean Seed Rate Hike  Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Free Soybean Seed : मोफत सोयाबीन बियाणे योजनेत अनेक शेतकरी वंचित

निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; ३९८ अर्जापैकी ३२२ लाभार्थ्यांची निवड

पुढारी वृत्तसेवा

Many farmers left out of the free soybean seed scheme

सोयगाव, पुढारी वृत्तसेवा: खरीप हंगामाच्या तोंडावर राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया (गळीतधान्य-सोयाबीन) योजनेंतर्गत १०० टक्के अनुदानावर सोयाबीन बियाणे वाटपासाठी कृषी विभागाने ऑनलाइन अर्ज मागविले होते. सोयगाव तालुक्यात या योजनेसाठी तब्बल ३९८ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी लकी ड्रॉद्वारे ३२२ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये १०७महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे. मात्र निवड प्रक्रियेबाबत अनेक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

खरीप पेरणीला सुरुवात होत असतानाच महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. खासगी कंपन्यांच्या बियाण्यांचे वाढलेले दर परवडत नसल्याने अनेक शेतकरी कृषी विभागाच्या मोफत बियाणे योजनेकडे आशेने पाहत होते. मात्र अर्ज करूनही मोठ्या संख्येने शेतकरी लाभापासून वंचित राहिल्याने नाराजी वाढली आहे.

महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देण्याच्या धोरणामुळे पुरुष शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर निवड झाली नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. तालुक्यात बहुतांश शेती पुरुषांच्या नावावर असली तरी महिलांना प्राधान्य दिल्याने अनेक पात्र शेतकरी लाभापासून दूर राहिल्याची भावना व्यक्त होत आहे.

दरम्यान, बाजारात सोयाबीन बियाण्यांची टंचाई कायम असून खासगी बियाण्यांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी सुमारे २,५०० रुपयांना मिळणारी २५ किलोची बियाण्याची बॅग यंदा ३,२०० रुपयांपर्यंत पोहोचल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खर्च करूनही लाभ न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. बियाणे वाटपाची प्रक्रिया अधिक पारदर्शक करावी, पात्र शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

पादर्शकता हवी

यासंदर्भात कृषी भूषण अरुण सोहनी व अनिल देसाई, दत्तात्रय काटोले यांनी, "ऑनलाइन अर्ज करूनही मोठ्या संख्येने शेतकरी वंचित राहत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कृषी विभागाविषयी नाराजी वाढत असून निवड प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याची गरज आहे अशी खंत व्यक्त करत प्रशासनाने यात पारदर्शकता आणण्याची गरज असल्याची मागणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT