Manpower of city police will increase, pending issues will be resolved soon
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: शहर पोलिस दलातील अपुऱ्या मनुष्यबळाचा प्रश्न लवकरच सुटण्याची चिन्हे असून, पोलिस ठाण्यांच्या आणि शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या गरजेनुसार अतिरिक्त पोलिस बळ देण्यास राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. तसेच शहर पोलिसांचे शासनाकडे प्रलंबित असलेले अनेक महत्त्वाचे प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पोलिस आयुक्तालयातील आढावा बैठकीनंतर गुरुवारी (दि.६) दुपारी ३ वाजेच्या सुमारास महासंचालक दाते यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यगृहात पोलिस अधिकारी व अंमलदारांशी थेट संवाद साधला. सुमारे अडीच तास चाललेल्या या कार्यक्रमात त्यांनी पोलिसांच्या वैयक्तिक आणि कर्तव्यावरील अडचणी अतिशय शांतपणे ऐकून घेतल्या. हे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जागेवरच निर्देश दिले. या संवादातून मलाही बरेच काही शिकायला मिळाले, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
शहर पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी ड्रग्सच्या आहारी गेलेल्या तरुणांना या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी सामाजिक संस्थांची मदत घेऊन व्यसनमुक्तीचे उपक्रम राबविण्याच्या महत्त्वपूर्ण सूचना त्यांनी दिल्या आहेत.
हे प्रलंबित प्रश्न लागणार मार्गी !
शहर पोलिस दलाचे अनेक प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहेत. तसे सविस्तर प्रस्ताव नव्याने पाठविण्याच्या सूचना दाते यांनी दिल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने खालील प्रश्नांचा समावेश आहे-
1मनुष्यबळ वाढणार : लोकसंख्येच्या आणि पोलिस ठाण्याच्या गरजेनुसार शहराला जादा पोलिस बळ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
2 चिकलठाणा, करमाड व बिडकीन पोलिस ठाणे शहर आयुक्तालयात घेणे आणि वाळूज हद्दीत रांजणगाव शेणपुंजी येथे नवीन पोलिस ठाणे स्थापन करणे.
भाड्याच्या ठाण्यांना मुक्ती : सातारा, हसूल,
3 जवाहरनगर, बेगमपुरा, पुंडलिकनगर या पोलिस ठाण्यांसह वाहतूक व सहायक आयुक्त कार्यालये सध्या भाड्याच्या जागेत आहेत. त्यांना स्वतःची हक्काची जागा मिळवून देणे.
4 नवीन इमारती व वसाहत : देवगिरी मैदानाजवळ
चौक ठाण्यांच्या नवीन इमारती उभारणे. तसेच क्रांती चौकातील जुन्या खंडर पोलिस वसाहतीच्या जागी पोलिसांसाठी नवीन सुसज्ज वसाहत उभारणे