छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या नियमांमध्ये बदल करण्याची लेखी हमी मिळाल्याने उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी रविवारी (दि.31) पत्रकार परिषदेत दिली. मात्र सरकारने दिलेल्या मुदतीत मागण्यांवर अपेक्षित कार्यवाही केली नाही, तर मराठा समाजासाठी पुन्हा एकदा संघर्षाचे रणशिंग फुंकण्याचा इशाराही त्यांनी दिला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे यांनी शनिवारी (दि.30) सकाळी अंतरवाली सराटी येथे भर उन्हात शेतात बसून उपोषण सुरू केले होते. सरकारच्या शिष्टाईनंतर रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास त्यांनी उपोषण मागे घेतले. त्यानंतर उपचारासाठी त्यांना शहरातील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी जरांगे म्हणाले, सरकारच्या वतीने आलेल्या शिष्टमंडळाने, 58 लाख कुणबी नोंदींना प्रमाणपत्र व वैधता देण्याचे, तसेच हैदराबाद गॅझेटनुसार एसओपी जारी करण्याचे आश्वासन दिले आहे. आंदोलनादरम्यान मराठा समाजबांधवांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली.
प्रमाणपत्र वितरणात अडथळे निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, सातारा संस्थानासंदर्भात महिनाभरात जीआर काढण्यात येईल, शिंदे समितीला एक वर्षाची मुदतवाढ दिली जाईल, तसेच ओबीसी मंत्रालयाच्या धर्तीवर मराठा-कुणबी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन सरकारने दिल्याचे त्यांनी सांगितले. जात पडताळणी प्रमाणपत्राअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश रोखले जाणार नाहीत, तसेच मान्य केलेल्या मागण्यांबाबत तातडीने अधिसूचना काढण्यात येईल, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.
त्यामुळे सरकारने आता दिलेल्या आश्वासनांची वेळेत अंमलबजावणी करावी; अन्यथा समाजाच्या हक्कांसाठी पुन्हा लढा उभारण्यास आपण सज्ज असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आमदार प्रसाद लाड यांनी रविवारी सकाळी रुग्णालयात भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
जरांगे यांनी काँग््रेास नेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी काँग््रेासचे नेते धनंजय मुंडे यांच्यावरही टीकास्त्र सोडले. त्यांच्या सत्ताकाळात ओबीसी आणि मराठा या दोन्ही समाजांचे नुकसान झाल्याचा आरोप त्यांनी केला. मुंडे यांचे नाव न घेता परळीचा नेता असा उल्लेख करत जरांगे म्हणाले, माझी आणि त्यांची नार्को टेस्ट करा, मी त्यासाठी तयार आहे. त्यानंतर मला जेवणातून विष देऊन मारण्याचा कट नेमका कोणाचा होता, हेही स्पष्ट होईल.